ट्रेन सध्या तरी नकोच!

सार्वजनिक वाहतुकीवरचे कडक निर्बंध सामान्यांना जाचक ठरू लागले आणि अनेक नियम घालून बससेवा सुरू करण्यात आली. पण अतिउत्साही सामान्यजनांनी सर्व नियम फाटय़ावर मारून बसमधून प्रवास सुरू केला. याची परिणिती पुन्हा कोरोनाने तीव्र स्वरूपात डोकं वर काढण्यास सुरुवात केली. काय आहेत सार्वजनिक परिवहनाचे तोटे…

मुंबईतील जनसामान्यांच्या प्रवासाचा आधार असलेली लोकल सेवा कोरोना महामारीच्या काळात संपूर्णतः बंद आहे. सध्या तर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांकरिताच ही सेवा सुरू आहे. त्यामुळे दररोज डहाणू, पालघर, कल्याण, वसई, कसारा अशा मुंबईतील विविध भागांतून पोटापाण्यानिमित्त घराबाहेर पडणाऱया प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग होत असला तरी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन लोकल वाहतूक सुरू करावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे इतर प्रवाशांनाही दिलासा मिळेल. मात्र महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे सुरू होण्यामागील तोटे यावर डॉक्टरांचे मत आणि प्रवाशांची गरज लक्षात घेऊया…

रेल्वे सुरू करण्याची मागणी होणारच…

मी दररोज कार्यालयात जाण्याकरिता प्रवास करते. रेल्वे बंद असल्यामुळे बसने प्रवास करावा लागतो. बस वेळेत मिळायला हवी म्हणून नेहमीपेक्षा फारच लवकर घरातून बाहेर पडावे लागते. महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी घरी येताना खूप हाल होतात. बस वेळेवर मिळत नाही. शिवाय याच वेळेत ऑफिसमधून सुटलेल्यांची भलीमोठी रांग लागलेली असते, पण बस आली की, लोक बसमध्ये चढण्यासाठी पूर्वीसारखीच गर्दी करतात. शिवाय एका सीटवर दोघेजणही काही बसेसमध्ये बसतात. बसमधील रांगेतही खूप लोक जवळ जवळ उभे असतात. त्यामुळे सामाजिक अंतर राखलं जात नाही. तसेच संध्याकाळी गर्दीच्या वेळी बस थांबवत नाहीत, चालत्या बसमधून गडबडीने उतरावं लागतं. जवळच्या अंतरासाठीही दोन-दोन बसेस पकडून प्रवास करावा लागतो. – खुशबू जाधव, प्रवासी

नियमांचं पालन करा…

लोकल सुरू करणं हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. कारण आपल्याकडे बऱयाच लोकांना शिस्त नाही. लोकल सुरू झाली की, पूर्वीसारखीच गर्दी होऊ शकते. तसेच सध्या इतर पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणं तेवढं खिशाला परवडणारं आणि प्रवासासाठी सोयीचं नाही. लोकांना नोकरी जाण्याची भीतीही आहे. म्हणून बसने जायला यायला उशीर झाला तरीही लोक प्रवास करू लागले आहेत, पण गर्दी नियंत्रणात आणणं फारच कठीण आहे. लोकलमध्येही सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन करायला हवं. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. प्रवासात सरकारी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. काही ठिकाणी लोकांना वाटतंय की, कोरोना आता राहिलेला नाही. सरकार सगळे पैसे खाण्यासाठी करतेय. त्यामुळे काही लोक मास्क न वापरता फिरताना दिसतात. लहान मुलांनाही आमच्याकडे काही वेळा मास्क न घालता घेऊन येतात. त्यामुळे सध्याची परिस्थिती बिकट आहे. – डॉ. राहुल चौधरी, स्पंदन फाऊंडेशन, अंबरनाथ

रेल्वेत सामाजिक अंतर कसं राखाल ?…

केव्हा ना केव्हातरी रेल्वे सुरू होणारचं. बसने प्रवास करणं दरवेळी सोयीचं होईलच असं नाही. चार पाच तास प्रवास जातात. ही समस्या लक्षात घेता लोकल सुरू झाली तरी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. यादरम्यान सोशल डिस्टंन्सिंग कसं सांभाळणार हो मोठा प्रश्न आहे? लोकांनी नियमांचं जबाबदारीने आणि काटोकोर पालन करावं नाहीतर गंभीर परिस्थिती निर्माण होऊन रुग्णसंख्या वाढू शकते. – डॉ. मनोहर अकोले, डोंबिवली

बस आणि रेल्वे प्रवासाचे तोटे

 • प्रवासादरम्यान होणाऱया गर्दीमुळे सामाजिक अंतर राखलं जाईल याची खात्री नाही.
 • बरेच जण मास्क , सॅनिटायझर अजूनही नीट वापरत नाहीत. नाकाच्या खाली मास्क लावतात.
 • प्रवासातच सगळा दिवस निघून जातो.
 • कोरोना आता राहिलेला नाही, अशी बेजबाबदार वृत्ती बाळगणारेही काही जण आहेत.
 • प्रवासावेळी चोरीच्या घटना घडत आहेत.
 • शेजारी बसलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे सांगता येत नाही.
 • प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

उपाय

 • मास्क वापरण्याची योग्य पद्धत समजून घ्यावी.
 • प्रवासावेळी जास्तीचा एक मास्क पर्समध्ये ठेवावा. शिवाय सॅनिटायझर सर्व वस्तूंसोबत घेऊनच बाहेर पडावे.
 • जी कामे प्रत्यक्ष घराबाहेर न पडता फोनद्वारे, ईमेलद्वारे होण्यासारखी आहेत ती घरूनच करावीत.
 • प्रवासावेळी आपल्या बाजूला कोरोना रुग्ण आहे अशा पद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी.
 • लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करू नये.
 • कमीत कमी संख्या असलेल्या वाहनाने प्रवास करावा.
 • घरून निघणं, कार्यालयातून निघणं या वेळांचं, स्वतःच्या कामाचं नियोजन करावं.
 • आवश्यक तेवढेच आणि गरजेचे सामान सोबत घेऊन प्रवास करावा.
 • सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रीनिंग तसेच गर्दी टाळण्यासाठी केलेल्या सूचनांचे पालन करावे.
 • प्रवास करण्याआधी आणि नंतर हाताला व्यवस्थित सॅनिटायझर लावावे किंवा हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
 • कार्यालयातही स्वच्छतेच्या सर्व वस्तू उपलब्ध करून देण्याची मागणी करावी.
 • प्रवास करून घरी गेल्यावर अंघोळ करावी.
 • प्रवासावेळी घातलेले कपडे धुऊनच पुन्हा वापरावे.
 • गर्दीच्या जागा टाळाव्यात.
आपली प्रतिक्रिया द्या