महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था नीट चालू नये ही दिल्लीची इच्छा! जयंत पाटील यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना रुग्णांची सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रात असल्याने जास्त लसी या महाराष्ट्राला मिळायला हव्यात, मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना कोरोना संकटाचा मुकाबला करत आहेत. मात्र काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त त्यांचा महाराष्ट्रद्वेष प्रतित होत आहे. केवळ विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न

कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्णसंख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

अनिल देशमुख लवकरच मंत्रिमंडळात दिसतील

सीबीआयची प्राथमिक तपासणी झाल्यावर अनिल देशमुख यांच्यावर ठपका असणार नाही. त्यामुळे ते लवकरच मंत्रिमंडळात दिसतील. सीबीआय चौकशीनंतर आमचा पक्ष त्यांचा विचार नक्की करेल, ते विदर्भातील प्रमुख नेते आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सचिन वाझे याच्या पत्राबाबतही जयंत पाटील यांनी उत्तर दिले. यामागे सरकार कधी जाईल याची वाट पाहणाऱया शक्ती आहेत हे जनतेला दिसत आहे. भाजप नेत्यांनी दोन-तीन दिवस थांबा अजून एक विकेट पडेल, असे भाष्य करणं आणि नंतर एनआयएमधून पत्र बाहेर येतं. भाजप नेते बोलतात त्यानंतर एनआयएकडून माहिती बाहेर येते. तपास सुरू आहे की राजकारण सुरू आहे, असा सवाल त्यांनी केला.

सत्ता मिळेल ही स्वप्नं बघत आहेत

केंद्राने जीएसटी परतावा कमी दिला बोलायचं नाही का? केंद्राने अत्याचार केले तर बोलायचं नाही का? सत्तेशिवाय बाहेर असणारे सतत सत्ता मिळवण्यासाठी सत्ता मिळेल असं स्वप्न बघतात, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

  • राज्यात लसींचा तुटवडा असताना फडणवीसांनी दिल्लीच्या बाजूने बोलणे योग्य नाही. आकडेवारी काय सांगते ते बघा. फडणवीस महाराष्ट्रातील असून महाराष्ट्राबरोबर भांडत आहेत. केंद्राशी किमान भांडू नका, पण त्यांच्याकडे आग्रह तरी धरा, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.