वारंवारच्या दुखापतींमुळे क्रिकेटपटू पुकोवस्की 26 व्या वर्षीच निवृत्त

26 व्या वर्षीय अनेक क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही सुरू झालेली नसते. मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाज विल पुकोवस्कीला वारंवार होणाऱ्या दुखापतींना कंटाळून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला. एका वैद्यकीय अहवालानुसार डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर पुकोवस्कीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. फक्त एक कसोटी खेळलेल्या पुकोवस्कीला आपल्या छोट्याशा कारकीर्दीत तब्बल 13 वेळा डोक्यावर चेंडूचा मार खावा लागला आहे.

विलने 2021 च्या सिडनी कसोटीत हिंदुस्थानविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने आपल्या पहिल्याच डावात 62 धावांची खेळी करत दमदार पदार्पण केले. मात्र त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही संघात दिसला नाही. व्हिक्टोरिया संघासाठी खेळणाऱ्या पुकोवस्कीला ऑस्ट्रेलियन संघात फारशी संधी मिळाली नाही. तसेच तो दुखापतीमुळेही वारंवार बाहेरच असायचा.

2017 साली प्रथम श्रेणी पदार्पण करणाऱ्या विलला केवळ 36 सामनेच खेळता आले होते. त्याने 45.19 च्या सरासरीने 2350 धावा केल्या आहेत. यात सात शतकांचाही समावेश आहे. वारंवार डोक्याला लागणाऱ्या चेंडूंमुळे त्याची प्रकृतीही खालावली होती. मात्र त्याला डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे प्रकृती ढासळली नव्हती तर त्याने दुखापतींचा घेतलेला तणाव हेच त्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण करणारे ठरले. याचा विपरीत परिणाम त्याच्या खेळावरही झाला.

मार्च 2024 मध्ये रिली मेरेडिथच्या गोलंदाजीवर शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत झालेली दुखापत गंभीर होती. या दुखापतीमुळे त्याला पूर्ण मोसम बाहेर बसावे लागणार आहे. यामुळे त्याचा लिसेस्टरशायरशी असलेला करारही गमवावा लागला. या सर्व गोष्टींमुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. त्याच्या बॅटीतून निघणाऱ्या धावांचा स्रोतही आटला होता. परिणामतः त्याने क्रिकेट कारकीर्द थांबवण्याचा निर्णय घेतला.