
हैदराबादविरुद्ध शेवटचे षटक यशस्वी टाकत अर्जुन तेंडुलकरने मुंबईच्या विजयाची हॅटट्रिक साजरी केली. या विजयानंतर महान फलंदाज सुनील गावस्करांनी अर्जुनला सचिनच्या स्वभावाचा वारसा लाभल्याचे सांगत त्याचे कौतुक केले. सचिनने आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभी जी अद्भुत प्रतिभा दाखवली होती, त्याबाबत आजही त्याबद्दलच बोलले जाते, पण त्याचा स्वभावही अद्भुत होता, तो स्वभाव अर्जुनला वारसारुपाने लाभल्याचे गावस्कर यांनी आवर्जून सांगितले. अर्जुन चतुरस्त्र खेळाडू असल्याचेही गावस्कर म्हणाले. जेव्हा एक युवा खेळाडू आपल्या संघासाठी शेवटचे षटक टाकतो आणि यश मिळवतो, हे नेहमी चांगले संकेत असते. तो खरोखर एक गुणवान डावखुरा गोलंदाज आहे.
आज सचिनला आपल्या पुत्राचा अभिमान असेल
अर्जुनने शेवटचे षटकात विकेट घेत मुंबईला विजय मिळवून दिल्यानंतर चोहोबाजूंनी सचिन आणि अर्जुनवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. त्यात सेहवागचे नाव अग्रक्रमावर आहे. तो ट्विट करत म्हणाला, अर्जुन चांगली कामगिरी करतोय, हे पाहून मला खूप आनंद झालाय. आज सचिन पाजींना आपल्या अर्जुनाचा अभिमान वाटत असेल. अर्जुनच्या अथक प्रयत्नांना अखेर यश लाभले. माझे आशीर्वाद आहेत, ही तर चांगल्या गोष्टींची सुरूवात आहे. जबरदस्त अर्जुन.
अर्जुनने घेतला बापाचा बदला
14 वर्षांपूर्वी म्हणजे 2009 साली रणजी करंडकात खेळताना भुवनेश्वर कुमारने सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद केले होते आणि या विकेटने उदयोन्मुख भुवनेश्वरला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आज त्याच भुवनश्वरला हैदराबादच्या त्याच मैदानावर बाद केले आणि आपला पहिला विकेटसुद्धा टिपला, मुंबईला विजयसुद्धा मिळवून दिला. फरक इतकाच होता की तो सामना रणजी करंडकाचा अंतिम सामना होता, तर हा मुंबई-हैदराबादचा साखळी सामना.



























































