
पहाटेच्या वेळेस रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची लुटमार करणारे दोघे सराईत गुन्हेगार पार्कसाईंट पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांचा तिसरा साथीदार रिक्षाचालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
कुणाल (35, नाव बदललेले) हा तरुण 5 तारखेला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास विक्रोळी स्थानक येथून एलबीएस रोडने पायी जात असताना त्यांना एका रिक्षाचालकाने सूर्यानगर जाणार का, अशी विचारणा केली. कुणाल हो म्हणत रिक्षात बसला. रिक्षात आधीच दोघे जण बसलेले होते. काही अंतरावर रिक्षा गेल्यानंतर त्या दोनी जबरदस्ती करत कुणालच्या खिशातील दहा हजारांची रोकड, मोबाईल फोन आणि एका कानातली सोन्याची रिंग काढून घेतली. मग त्याला सूर्यानगर येथे न सोडता हुमा टॉकिज परिसरात सोडून आरोपींनी पळ काढला. या घटनेनंतर कुणालने पार्कसाईंट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मोहन जगदाळे, नितीन कदम तसेच योगेश गायकवाड, प्रवीण गोसावी, राहुल नवले, अजित पाटील, कोल्हे या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु त्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने रिक्षाची नंबर प्लेट नीटशी दिसत नव्हती. तरीदेखील तांत्रिक तपास व खबऱयांना कामाला लावून पोलिसांनी आरोपींची माहिती मिळवली. गुह्यातील आरोपी कल्याणजवळील बनेली येथील राहणारे असून ते रेकॉर्डवरचे आरोपी असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी एकाला डोंबिवलीत पकडले. मग त्याच्या साथीदाराला बनेली येथे पकडले. कमिल हजारु आणि मुसा शेख अशी त्या दोघांची नावे असून त्यांचा तिसरा साथीदार रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे. हे आरोपी लोकल तसेच रिक्षामध्ये प्रवाशांची लुटमार करतात.



























































