
राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ मंदिरात गुरुवारी सकाळी आरती करण्यास पोलीस प्रशासनाने विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. महसूल प्रशासनाने बुधवारी रात्री गुहा गावातील कानिफनाथ मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लावल्याने संतप्त गावकऱयांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले. गावकऱयांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. अखेर पोलीस व महसूल प्रशासनाने गावकऱयांच्या शिष्टमंडळासोबत तहसील कार्यालयात बैठक घेऊन गावकऱयांच्या प्रमुख मागण्या मान्य करून कानिफनाथ मंदिर परिसरात लावण्यात आलेला जमावबंदी आदेश मागे घेऊन मंदिरात दररोज पूजाअर्चा करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने गुहा ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.
महसूल विभागाने गुहा गावातील कानिफनाथ मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू केल्याने पोलीस प्रशासनाने गावकऱयांना आरती करण्यास विरोध केला. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण झाले होते. अखेर गावकऱयांनी वेशीवर कानिफनाथ महाराजांची आरती करून प्रशासनाचा निषेध केला. गुरुवारी रात्री महसूल व पोलीस प्रशासनाने तहसीलवर येणारा मोर्चा थांबविण्यासाठी प्रमुख गावकऱयांबरोबर रात्रभर अनेक ठिकाणी बैठका घेतल्या; परंतु गावकरी मागण्यांवर ठाम राहिले. शुक्रवारी सकाळी मोर्चासाठी गुहा गावातून दुचाकी रॅली, 50 ते 60 ट्रक्टर ट्रॉलीत बसून गावकरी राहुरीच्या दिशेने निघाले. यावेळी नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तहसील कार्यालयावर पोहोचताच गावकऱयांनी उपोषणाचे फलक हातात घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले.
मोर्चातील ठराविक गावकऱयांसमवेत प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत गुहा गावकऱयांनी केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी 5 मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यामध्ये कानिफनाथ मंदिर परिसरातील जमावबंदी आदेश रद्द करण्यात येऊन दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे.
पूर्वापार चालत आलेल्या पूजेस व पंचामृत पूजेस महाप्रसादास बाधा आणू नये, कानिफनाथ महाराज मंदिराचा धर्मादाय आयुक्तांकडील ट्रस्ट नोंदीचा फलक लावण्यास परवानगी द्यावी, संबंधित समाजाने मंदिरात जाण्या-येण्यास अडथळा केल्यास पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने कारवाई करावी, वक्फ बोर्ड व दर्ग्याबाबत जिल्हाधिकाऱयांसमवेत दोन्ही समाजांची बैठक घेण्यात येऊन त्यावर जिल्हाधिकाऱयांच्या आदेशान्वये मार्ग काढावा, कानिफनाथ मंदिराच्या इनामी जमिनीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत व वक्फ बोर्डाची नोंद रद्द करावी. कान्होबा ऊर्फ हजरत रमजान शहा दर्गा याची चौकशी करून त्याची नोंदणी रद्द करण्यात यावी आदी मागण्या गावकऱयांनी केल्या होत्या. त्यापैकी पाच मागण्या मान्य करून जमावबंदी आदेश लगेच रद्द करण्यात आला. मंदिर खुले केल्याने आंदोलन जल्लोष करीत मागे घेतले आहे.



























































