
सामना प्रतिनिधी । लातूर
अनुसुचित जातीसाठी राखीव असणाऱ्या लातूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची माळ कोणाच्या गळयात पडणार हेच अजून ठरलेले नाही. कुणाच्या रंगाचा बेरंग होणार हे येणारा काळच ठरविणार आहे. सध्या मात्र इच्छूक उमेदवार माझीच उमेदवारीची लॉटरी लागणार हे सांगत सुटलेले आहेत.
लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार कोण राहणार हे अजूनही निश्चीत झालेले नाही. भाजपाचे विद्यमान खासदार सुनिल गायकवाड यांना पुन्हा एकदा नितीन गडकरी मार्फत मटका लागणार का याचीच चर्चा होत आहे. लातूर जिल्ह्यातील संपूर्ण पक्ष, संघटना विद्यमान खासदारांच्यावर नाराज असल्याचे जाणिवपूर्वक आजपर्यंत भासवण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गटाने आपआपल्या संभाव्य उमेदवारास पुढे रेटण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे कांही जण तर अनेक वर्षांपासून पक्षासाठी पैसा खर्च करत असल्याचे आणि प्रसिध्दीत असल्याचे दाखवत असल्याचे लातूरकर अनुभवत आहेत. बहुजन वंचित विकास आघाडीने मात्र आपला उमेदवार जाहीर करुन टाकला परंतु तो उमेदवारच फारशी दखल घेण्यायोग्य नसल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे. त्यामुळे लातूरातील खरी लढत ही भाजपा युतीचा उमेदवार आणि काँग्रेस आघाडीचा उमेदवार यांच्यातच होणार हे स्पष्ट दिसून येत आहे.
काँग्रेसकडेही उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचे भासवण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात त्यामधील कितीजण काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने केलेले आहेत, हा प्रश्नच जेष्ठ नेत्याने विचारुन अनेकांची बोलती बंद केल्याचे किस्सेही आता सांगीतले जात आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी तब्बल ३८ जणांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेले. प्रत्यक्षात कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सोमवारी आणि त्यांनतरच उमेदवारी अर्ज दाखल केले जातील असे म्हटले जात आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारीची लॉटरी कोणत्या उमेदवाराला लागणार आणि कुणा कुणाच्या रंगाचा बेरंग होणार याचीच चर्चा सध्या मात्र मतदारसंघात केली जात आहे.























































