गुगलने जातीभेद केला! दलित कर्मचाऱ्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील गुगलच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर जातीभेद चालतो, असा आरोप एका दलित कर्मचाऱ्याने केला आहे. या कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपांमुळे गुगलवर टीका होत आहे.

अमेरिका येथे असलेल्या गुगल मुख्यालयात जातीभेद केला जातो तसंच तिथे अशा कर्मचाऱ्यांविरोधी वातावरण असल्याचा आरोप तेथील दलित कर्मचारी देनमोझी सुंदरराजन यांनी केला आहे. या प्रकरणी दलित अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्या इक्वालिटी लॅब या संघटनेने देखील गुगलवर आरोप केला आहे.

देनमोझी सुंदरराजन यांचं एक भाषण गुगलतर्फे आयोजित करण्यात आलं होतं. मात्र, ते काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या प्रसाराच्या कारणाने ऐनवेळी रद्द करण्यात आलं. या प्रकरणी वॉशिंग्टन पोस्टने वृत्त दिल्यानंतर ही बाब प्रकाशझोतात आली. या घटनेनंतर सुंदरराजन यांनी गुगलमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दुसरीकडे गुगलने हे आरोप फेटाळले आहेत. गुगलचे प्रवक्ते शॅनन न्यूबेरी म्हणाले की, आमच्या कार्यालयात जातीभेद केला जात नाही. त्यासाठी आम्ही सुस्पष्ट धोरणं आखली आहेत. हे सर्वांनाच ठाऊक आहे, असं न्यूबेरी म्हणाले आहेत.

दरम्यान, सुंदरराजन यांच्या राजीनाम्यानंतर गुगलच्या कर्मचारी असलेल्या तनुजा गुप्ता यांनीही राजीनामा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जातीभेदाखेरीज इथे वर्णभेद आणि लिंगभेदही मोठ्या प्रमाणावर चालतो. वेगळ्या वर्णाच्या महिलांना इथे त्रास दिला जातो आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्नही होतो, असा आरोप गुप्ता यांनी केला आहे.