
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात यशपाल सिंह याला दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने फाशीची शिक्षा तर दुसरा आरोपी नरेश सहरावत याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. शीखविरोधी दंगलीत 34 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.
दक्षिण दिल्लीमधील महिपालपूरमध्य हरदेव सिंह आणि अवतार सिंह यांची 1984 मध्ये शीखविरोधी दंगलीत निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी आरोपी यशपाल सिंह, नरेश सहरावत यांना बुधवारीच अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांनी दोषी ठरविले. यानंतर या दोघांनाही बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी कोठडीत केली. मंगळवारी याप्रकरणी न्यायाधीश पांडे यांनी आपला निकाल जाहीर केला.
सुटलेले आरोपी एसआयटीमुळे पुन्हा अडकले
या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी यशपाल सिंह, नरेश सहरावत यांना यापूर्वी अटक होऊन त्यांच्याविरोधात पोलिसात केस दाखल झाली होती. परंतु त्यांच्याविरोधात कोणीही साक्ष देण्यासाठी पुढे न आल्याने हे प्रकरण दिल्ली पोलिसांनी बंद केले. यामुळे तेव्हा हे आरोपी सुटले. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारच्या आदेशानुसार या दंगलीची फेरचौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. या चौकशीत हे दोन्ही आरोपी दोषी आढळल्यामुळे ते पुन्हा अडकले.
























































