
आगामी विधानसभा निवडणूक लढवायला पैसे नाहीत, लोकांनी आम्हाला मदत करावी असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्लीच्या बुराडी भागात मुख्यमंत्री केजरीवाल एका सभेला संबोधित करत होते. तेव्हा लोकांनी आम्हाला आर्थिक मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच दिल्लीत ज्या अनधिकृत वसाहती अधिकृत करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर त्यांनी टीका केली.
गेल्या पाच वर्षात आम्ही दिल्लीत खूप काम केले असे केजरीवाल म्हणाले. आगामी निवडणूक लढवण्यासाठी आमच्याकडे एक रुपया नाही. गेल्या पाच वर्षात आम्ही एक रुपयाही कमावला नाही. निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही मदत करायची की नाही हा तुमचा निर्णय आहे असेही केजरीवाल म्हणाले.
दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर केजरीवाल यांनी टीका केली. केजरीवाल म्हणाले की, “या अनधिकृत वसाहतींना अधिकृत करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे विनंती केली. आमचा रजिस्ट्रेशनच्या किचकट प्रक्रियेला विरोध आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही या वसाहतीत रस्ते, सांडपाणी आणि नळ जोडणी दिल्या. तेव्हा केंद्र सरकारने हा निर्णय का नाही घेतला?” निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना मुद्दा आठवला असेही केजरीवाल म्हणाले.

























































