
>> नीलेश कुलकर्णी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कारकीर्दीतला चौथा अर्थसंकल्प उद्या सादर करतील. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याने हा अर्थसंकल्प जनतेचा असेल की निवडणुकीचा, या प्रश्नाचे उत्तर उद्याच मिळेल. कोरोनाच्या तीन लाटांनी जगणे मुश्कील केले असताना सरकार सवलतींचा मलम लावेल, अशी शक्यता दुरापास्तच आहे. पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने तिथल्या जनतेच्या पदरी अर्थसंकल्पात काहीतरी पडेल हीच एक आशा आहे.
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अमावास्येच्या मुहूर्तावर सादर होणार आहे. त्यामुळे या बजेटकडून जनतेने तरी काय अपेक्षा ठेवाव्यात?. अगोदरच चुकीच्या धोरणामुळे गेल्या आठ वर्षांत जनतेच्या आयुष्यात काळोख पसरलेला असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा यंदाचा अर्थसंकल्प हा काळोख दूर सारेल, ही अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरेल. देशाच्या तिजोरीत खडखडाट असला तरी निवडणुकांमुळे इंधन दरवाढीला ब्रेक लावाला लागत आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी भरण्यासाठी नवे कोणते उपाय अर्थमंत्री शोधतात याकडे देशाचे लक्ष लागलेले असेल. निवडणुकांमुळे सगळय़ाच बाबतीत आस्ते कदम टाकत यंदाचा अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे. जीडीपीत होणारी वाढ ही पंतप्रधानांच्या जगभरातील लोकप्रियतेत होणाऱ्या वाढीसारखीच आहे. त्यामुळे वरकरणी सरकारी आकडय़ांची हेराफेरी करून अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा केला जात असला तरी ‘अर्थव्यवस्थेचा पेशंट’ आयसीयूमधून अजूनही बाहेर आलेला नाही हे विदारक वास्तव आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सरकार काही कठोर पावले उचलणार का, हेही पाहणे औत्सुक्यपूर्ण असणार आहे. मुळात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संसदेतील बहुतांश खासदार आपापल्या मतदारसंघात प्रचारकार्यासाठी जातील. त्यामुळे मोकळ्या बाकडय़ांसमोर अर्थसंकल्पावर चर्चा होईल. कोरोनाची आचारसंहिता असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळत खासदार एकाचवेळी लोकसभा व राज्यसभा तसेच प्रेक्षक गॅलरीत बसून या अर्थसंकल्पाच्या चर्चेत सहभागी होतील. एका नीरस अशा वातावरणात देशाचा यंदाचा अर्थसंकल्प सादर होतो आहे. अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच आशा असते, मात्र दरवेळी तोंडाला पाने पुसली जातात. यंदाचा अर्थसंकल्प सत्ताधाऱ्यांना पाच राज्यांतील पराभवातून वाचविण्यासाठी आशादायी ठरतो का, ते पाहणे मनोरंजक ठरेल.
खान मार्केट गँग!
माजी केंद्रीय मंत्री आणि कुशीनगरच्या राजघराण्याचे वंशज काँग्रेस नेते आरपीएन सिंग यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपचे कमळ हाती घेतल्याने काँग्रेसची ‘खान मार्केट गँग’ आता खऱ्या अर्थाने भाजपच्या रंगात रंगून गेली आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, आरपीएन सिंग, सचिन पायलट हे तरुण तुर्क मनमोहन सिंग सरकारमध्ये राज्यमंत्री होते. काँग्रेस नेतृत्वाचा उदारपणा आणि मनमोहन सिंग यांचे उदार नेतृत्व यामुळे ही राज्यमंत्री मंडळी संसदेचे अधिवेशन वगैरे असतानाही अधूनमधून चहापानासाठी खान मार्केटमध्ये जात असे. त्यामुळेच या मंडळींना ‘खान मार्केट गँग’ असे नाव पडले. अर्थात त्या काळात अशी मोकळीक होती म्हणूनच ही मंडळी खान मार्केटमध्ये जाऊ शकायची. नाहीतर सध्याच्या भाजप खासदारांना दटावून सभागृहातच विद्यार्थ्यांप्रमाणे बसवले जाते. त्याबाबतीत खान मार्केट गँग भलतीच ‘नशीबवान’ म्हणावी लागेल. बाकी भाजपमध्ये घराणेशाहीला वाव नाही. पक्षासाठीचे योगदान लक्षात घेऊन संधी दिली जाते, असे तारस्वरात कायमच बोलले जाते, मात्र काँग्रेसमधील आयात नेत्यांच्या घराणेशाहीला भाजपने जे प्रोत्साहन आणि वाव दिला आहे त्याला तोड नाही. शिंदे, जितीन यांच्यापाठोपाठ घराणेशाहीच्या राजकारणाचे काँग्रेसी वंशज आरपीएन यांचे भाजपने असेच वाजतगाजत स्वागत केले आहे. आता या आरपीएन यांना स्वामिप्रसाद मौर्यांविरोधात निवडणूक रिंगणात उतरविण्याचा भाजपच्या चाणक्यांचा इरादा आहे म्हणे. कुशीनगरमधून भाजपचे दिवंगत शरद त्रिपाठी व त्यांचे वडील रमापती राम त्रिपाठी यांनी याच आरपीएन यांचा सलग दोन वेळा दारुण पराभव केला होता. याचा विसर भाजप नेत्यांनी पडू देऊ नये इतकेच.
केंद्रीय मंत्र्यांचा बेताल
विश्वेश्वर टुडू हे या देशाचे मंत्री आहेत. ही ओळख सांगण्याचे कारण म्हणजे टुडू महाशयांनी दोन सरकारी अधिकाऱ्यांना हात तुटेपर्यंत मारहाण केल्याने सध्या ते देशभरात कुप्रसिद्धीस पावले आहेत. टुडू ओडिशातील बारापडाचे प्रतिनिधित्व करतात. ओडिशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने आचारसंहिता आहे. अशा स्थितीत टुडू यांनी सरकारी अधिकाऱ्यांना खासदार निधीसंदर्भातील कामासाठी फाईल घेऊन या असे फर्मावले. हुकमानुसार अधिकारी हजरही झाले, मात्र आदर्श आचारसंहिता असल्याने हे काम आताच करता येणार नाही असे या अधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयांना सुचवून पाहिले. त्यामुळे टुडू यांच्या रागाचा पारा असा काही चढला की त्यांनी समोर असलेली खुर्ची हातात घेऊनच देबाशिष महापात्रा आणि अश्विनी मलिक यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, त्यात महापात्र यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला तर मलिक गंभीर जखमी झाले. या दोघांनाही उपचारासाठी थेट कटकला दाखल करावे लागले. असा काहीच प्रकार घडला नसल्याचे सांगत टुडू यांनी बिजू जनता दलाचा आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा हास्यास्पद दावा केला आहे. याच टुडू यांच्यावर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्य क्योंझर जिल्ह्यातील बैठकीत एका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा पराक्रम जमा आहे. मयूरभंजमधील एका सरकारी बैठकीत टुडू यांनी ओडिशा भाषेत अधिकाऱ्यांना इतकी शिवीगाळ केली होती की, ओडिशा प्रशासनीक सेवा संघाने त्याविरोधात निदर्शने केली होती. ‘चाल चरित्र और चेहरा’ अशी जपमाळ ओढणाऱ्या भाजपचे टुडू हे एक ‘अनोखे चरित्र’ आहे. दुसरे केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी उत्तर प्रदेशमधील जाहीर सभेत ‘पंडितवाद मुर्दाबाद’ चा जाहीर नारा दिल्याने तेथील पंडित वर्ग कमालीचा खवळला आहे. आधीच योगी सरकारवर ब्राह्मणविरोधी असल्याचा आरोप केला जात असताना बालियान यांच्या या विधानाने भाजपचा पाय आणखी खोलात जाण्याची भीती आहे.





























































