सतत पाणी प्यायला मागत असल्याने आईची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीपासून जवळ असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये नात्याला काळीमा फासणारी भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. आई  (50) रात्री सतत तंबाखू आणि प्यायला पाणी मागत असल्याने वैतागलेल्या सोळा वर्षाच्या मुलाने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने घाबरून वडिलांना फोनवर याबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याला आईची हत्या करण्याचे कारण विचारले असता त्याने दिलेले उत्तर ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तो आई वडील, मोठा भाऊ यांच्यासोबत ग्रेटर नोएडा  येथे राहत होता. आईला रात्री सतत पाणी पिण्याची सवय होती. यामुळे ती रात्री बेरात्री आरोपी मुलाला झोपेतून उठवायची व तंबाखू आणि पिण्यास पाणी मागायची. यामुळे मुलाची झोप मोडायची. याला तो कंटाळला होता. त्यातूनच त्याने आईची हत्या करण्याचा कट रचला. रविवारी वडील लग्नासाठी परगावी गेले होते. तर मोठा भाऊ गार्डची नोकरी करत असल्याने कामावर गेला होता. हीच वेळ साधून आरोपीने आई झोपेत असताना तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने वडिलांना फोन करुन आपण आईची हत्या केल्याचे सांगितले.

वडिलांनी याबद्दल पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. यावेळी घाबरलेल्या आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर पोलिसाी खाक्या बघून त्याने गुन्ह्याची कबुली केली.