महिलांची छेड काढाल तर खबरदार! आता आल्या लेडी बाऊन्सर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

जमाना बदलला आहे. महिलाही रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत, पण त्यांच्या सुरक्षेची हमी कुठलीच कंपनी देत नाही. अशा महिलांना आता घाबरण्याचे काम नाही. कारण त्यांच्या सुरक्षेसाठी आल्या आहेत लेडी बाऊन्सर. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत महिलांची छेड काढणाऱ्यांनो किंवा लिंगपिसाटांनो जरा सावधान ! पुण्यात पबमध्ये अशा लेडी बाऊन्सर खास महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

पुण्यात राहणाऱ्या 31 वर्षीय रेखा सुतार यांनी लेडी बाऊन्सर बनल्यानंतरचा त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांत कथन केला. सुरुवातीला त्यांना बाऊन्सरचा गणवेश घालताना लाज वाटायची. संपूर्ण आयुष्यात सलवार कमीजशिवाय कुठल्याही प्रकारचा ड्रेस परिधान केला नव्हता. घरून जेव्हा ट्राऊझर आणि शर्ट परिधान करून बाहेर पडायचे तेव्हा आजुबाजूचे मला पाहतच राहायचे. सुरुवातीला जरा विचित्र वाटले. पण, आता आपल्यात आत्मविश्वास आल्याचे रेखा यांनी सांगितले. रेखा या स्वामिनी लेडी बाऊंसर्समध्ये काम करतात. ही लेडी बाऊन्सर्स फर्म एका माजी ब्यूटिशन अमिता कदम यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू केली. सुरुवातीला पाच लेडी बाऊन्सर्स होत्या. आज या फर्ममध्ये तब्बल पन्नास लेडी बाऊन्सर्स काम करत आहेत. या सर्व लेडी बाऊन्सर्स पबच्या सुरक्षेसाठी आणि कार्यक्रमात सुरक्षेसाठी तैनात करण्यात येतात. महिलांसोबत गैरव्यवहार किंवा त्यांची छेडछाड काढणाऱ्यांना या लेडी बाऊन्सर्स चांगलाच धडा शिकवतात. याशिवाय मद्यधुंद झालेल्या महिलांचीही या बाऊन्सर्स मदत करतात.

सासूने अमिताला दिली हिम्मत
अमिता यांनी सांगितले, माझ्या बहिणीचे पती एक बाऊन्सर आहेत. त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. मी कधीच लेडी बाऊन्सर्सबद्दल ऐकले नव्हते. तसेच बारमध्ये जाणाऱ्या महिलांना मेल बाऊन्सर्समुळे जरा अवघडल्यासारखे वाटते. त्यामुळे मी स्वत: पुढाकार घेऊन स्वामिनी लेडी बाऊन्सर्स ही फर्म सुरू केल्याचे अमिता यांनी सांगितले. महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी लेडी बाऊन्सर्स असाव्यात असे वाटले. दरम्यान, कालिंदी सूर्यवंशी नावाची महिला बस अटेंडंटचे काम करते.

रात्रीच्या डय़ुटीसाठी नवऱ्याची परवानगी नव्हती
29 वर्षीय आरती भवुन यांनी रात्रीच्या डय़ुटीसाठी नवऱ्याची परवानगी नव्हती असे सांगितले. तेव्हा अमिता यांनी माझ्या घरी येऊन नवऱ्याची समजूत काढली. त्यांनी माझ्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली. आता मला कुठलीही भीती वाटत नसल्याचे आरती यांनी सांगितले.

असे प्रशिक्षण दिले जाते बाऊन्सर्सना
स्वसंरक्षण, बातचीत आणि व्यवस्थापन कौशल्य यांचे प्रशिक्षण देण्यात येते.
महिलांकडे वर्कआऊट करण्यासाठी वेळ नसतो. या महिला घरातल्या कामांनाच वर्कआऊट मानतात. लेडी बाऊन्सर्सचा दिवस दुपारी किंवा संध्याकाळी सुरू होतो.

किती पैसे मिळतात
पबमध्ये कामाच्या मोबदल्यात लेडी बाऊन्सर्सना महिन्याला 10 ते 15 हजार रुपये आणि एखाद्या मोठय़ा इन्वेंट्ससाठी 8 ते 10 हजार रुपये मिळतात. त्यांना 8 तास काम करावे लागते.

लेडी बाऊन्सर्सची मागणी वाढली
पुण्यात सध्या लेडी बाऊन्सर्सची मागणी वाढते आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांसाठी लेडी बाऊन्सर्सचा पर्याय उत्तम ठरत आहे. लेडी बाऊन्सर्ससाठी दर महिन्याला तब्बल 20 मोठय़ा इव्हेन्ट्ससाठी कॉल्स येत आहेत. सध्याच्या घडीला महिलांची सुरक्षा हा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर लेडी बाऊन्ससर्सची मागणी वाढत चालल्याचे या लेडी बाऊन्सर्सनी म्हटले आहे.

summary- demand for lady bouncers got increased