हिंदुस्थानात लोकशाही मेलीय! राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर चिरडला जात आहे. हिंदुस्थानातील लोकशाही मरण पावली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केला आहे. कृषी विधेयके राज्यसभेत मंजूर करतेवेळी अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. आधी विधेयकातील तरतुदींवर चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती. मात्र सरकारने आवाजी मतदानात ही विधेयके मंजूर केली. राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी केल्यामुळे कायदा अस्तित्वात आला आहे. यासंदर्भात भूमिका मांडताना राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधक जागेवर बसले नव्हते, असा दावा केला होता. याचे खंडन करणारे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध झाले आहे. राज्यसभा टी. व्ही.च्या छायाचित्रावरून विरोधक जागेवर बसलेले दिसत आहेत. यावर राहुल गांधी यांनी छायाचित्रांच्या पुराव्यांसह ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे.