नोटाबंदी,राफेल सौद्यावरून पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कराड

उद्योगपती मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटा बंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा केला आहे. राफेल विमानाच्या खरेदीत झालेला भ्रष्टाचार उघड होऊ नये, म्हणूनच सीबीआय अधिकार्‍यांवर गंडांतर आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  कराडमधील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चव्हाण यांनी आरोप केला आहे की राफेल खरेदीत 36 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी होऊ नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि याचाच एक भाग म्हणून मध्यरात्री खेळ करत सीबीआयचे संचालक व विशेष महासंचालक यांना रजेवर पाठवण्यात आल्याचा चव्हाणांनी दावा केला आहे.

दोन वर्षापूर्वी नोटाबंदीचा निर्णय लादताना सरकारने देशाची मोठी हानी केली आहे. त्यामुळेच सरकारने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत उद्योगपती मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीच हा निर्णय घेतला गेला. रिझर्व्ह बँकेंची बैठक या निर्णयापूर्वी झाली होती. रिझर्व्ह बँकही या निर्णयाविरोधातच होती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्या बैठकीचीही अधिकृत माहिती सरकार लपवून ठेवत असल्याचा दावा करत नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली