माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; ‘हाच भाजपचा खरा चेहरा अन् चारित्र्य’ म्हणत काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाचे खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामुळे कर्नाटकातील राजकारण तापले असून महिला आयोगानेही याची दखल घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर कर्नाटक सरकार अॅक्शनमध्ये आले असून याप्रकरणी सखोल तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याची खबर लागताच खासदार रेवन्ना हे विदेशात पळून गेल्याचे वृत्त आहे.

प्रज्वल रेवन्ना हे हसन लोकसभा मतदारसंघातून जेडीएसच्या तिकीटावर निवडून गेले होते. यंदाही त्यांना याच मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. मात्र त्यांचे हजारो अश्लील व्हिडीओ समोर आल्यानंतर महिला आयोगाने कारवाईच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यानंतर 27 एप्रिल रोजी सिद्धरामय्या सरकारने याप्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले. हसन जिल्ह्यामध्ये प्रज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहेत. यात प्रथमदर्शनी त्यांनी महिलांचा लैंगिक छळ केल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले.

काँग्रेसचा हल्लाबोल

दरम्यान, काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत भाजपवर हल्ला चढवला आहे. ‘अश्लील व्हिडीओंनी भरलेल्या पेनड्राईव्हद्वारे हेच सिद्ध होत आहे की खासदार आणि एनडीएचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांनी हजारो महिलांचे लैंगिक शोषण करत त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले आहेत. ही घटना धक्कादायक असून सुसंस्कृत समाजाला कलंक लावणारी आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या खासदार रेवन्ना यांची एसआयटी चौकशी होणार असून धक्कादायक बाब म्हणजे भाजपला याची आधीपासूनच माहिती होती. परंतु सत्तेच्या लालसेत आकंठ बुडालेल्या भाजपने डोळे मिटून महिलांचे शोषण करणाऱ्याला तिकीट दिले. यामुळे महिलांचे आदर करण्याचे नाटक करणाऱ्या मोदींचे आणि भाजपचे सत्य देशासमोर आले आहे. हाच भाजपचा खरा चेहरा आणि चारित्र्य आहे’, असे ट्विट काँग्रेसने केले आहे. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटोही शेअर केला आहे. यात ते माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची भेट घेताना दिसत असून शेजारीत खासदार प्रज्वल रेवन्ना उभे असल्याचे दिसते.