
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम आणि शौर्याची माहिती देशातील सर्वांनाच आहे. राज्यपाल कोश्यारी यांनाही महाराजांच्या पराक्रमाची इत्थंभूत माहिती आहे, मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय आणि विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारींचा बचाव केला.
पुण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळय़ांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत बोलायचे तर आमचे आजचे हीरो हे शिवाजी महाराज हेच आहेत. कोणाच्याही मनात याबाबत शंका नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मनातही याबाबत काही शंका नसेल असे ते म्हणाले. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याबाबतही फडणवीस यांनी युक्तिवाद करत बचाव केला. या देशात आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कुठलाही आदर्श असूच शकत नाही. त्रिवेदी यांचे वक्तव्य मी नीट ऐकले आहे. त्यामध्ये त्रिवेदी यांनी कुठेही ‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली,’ असा उल्लेख केलेला नसल्याचे सांगितले.





























































