देवगड हापूसची पहिली पेटी मुंबयक निघाली! कातवणचा आंबा आज वाशी मार्केटमध्ये येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड तालुक्यातील कातवण येथील दिनेश व प्रशांत शिंदे या दोन युवा बागायतदारांनी देवदिवाळीचा मुहूर्त साधून आंबा काढणीचा शुभारंभ केला. मालाची खात्री करून हापूसची पहिली दोन डझनची पेटी नवी मुंबईतील वाशी मार्पेटमध्ये व्यापारी अशोक हांडे यांच्या पेढीवर आज पाठविण्यात आली.

शिंदे यांच्या घरानजीकच्या बागेत हापूसच्या कलमांना 15 ऑगस्टपासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र काही कलमांवर आलेला मोहर गळून पडला. उर्वरित चार ते पाच झाडांवर मोहर तसाच टिकून होता. त्यासाठी या शिंदे बंधूंनी त्यांची देखभालही चांगल्या रीतीने केली. त्यामुळेच तयार फळे वाशीला रवाना झाली.

आठ हजार भाव मिळणार

या दोन डझनच्या आंबा पेटीला साधारणतः सात ते आठ हजारच्या आसपास भाव मिळेल असा अंदाज शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. या वर्षी आंबा सीझन पाहता अजूनही हापूसच्या कलमांना पालवीच येत आहे. अशावेळी कलमांची योग्य निगा राखत पहिली पेटी या दोन युवा आंबा बागायतदारांनी पाठविली आहे.