देवगड मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम वर्षभरापासून रेंगाळले; खडी, खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे भाविकांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात प्रसिद्ध असलेल्या व श्रावण महिन्यासह दिवाळीपर्यंत भाविकांची मोठी गर्दी होत असलेल्या श्री क्षेत्र देवगड संस्थानकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. नगर-संभाजीनगर महामार्गावरून देवगड फाटा ते देवगड या मंदिराकडे येणाऱ्या पाच किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रेंगाळले आहे. त्यामुळे दुरुस्तीअभावी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, भाविकांचे मोठे हाल होत आहेत.

देवगड फाटा ते देवगड या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रेंगाळले आहे. वर्षभरापासून रस्त्याच्या कामासाठी आणून टाकलेली खडी रस्त्यावर पसरली असून, कुठेही रस्त्याला लेव्हल राहिलेली नाही. दहा मीटर रुंदीचा रस्ता; परंतु डोंगरावर अथवा वाळूतून चालल्याचा आभास व्हावा, असे दगड, गोटे, खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यालगत कुठेही साईड शोल्डरवर माती मुरुम भरलेला नाही. कुठलाही सुपरवायझर, वॉचमन, इंजिनीअर, यंत्रसामुग्री तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी अनेक दिवसांपासून आलेला नसल्याचे स्थानिक लोक सांगतात.

संपूर्ण उन्हाळा गेला तरी या रस्त्याचे कुठलेही काम झालेले नाही. या रस्त्यावर छोटे पूल, चाऱ्या तयार करणे गरजेचे होते. मात्र, पूल न केल्यामुळे झालेल्या रस्त्यावरून पाणी वाहत आहे. देवगड हे एक मोठे तीर्थक्षेत्र असून, एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्राला जाणारा प्रमुख ‘जिल्हा मार्ग 78’ हा थोडा पाऊस आला तरी बंद होतो. यात्रा, उत्सवस्थळ असल्याने येथे वर्षभर वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम सुरू असतात. याचे कुठलेही सोयरसुतक संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नाही.

नेवाशाकडून शॉर्टकट असलेला मडकी-पिंपरी रस्ता, तर खड्डे आणि खचलेला रस्ता यामुळे दुचाकी वाहन चालवणेदेखील शक्य होत नाही. त्यात अरुंद रस्ता असतानाही या रस्त्यावरून जड वाहने खडका येथील टोलनाका चुकवण्यासाठी येत असतात. त्यामुळे हा रस्तादेखील भाविकांसाठी जीवघेणा ठरत आहे.