शनिअमावस्येनिमित्त शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची अलोट गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनाथ कुसळकर । सोनई

शनिअमावस्येनिमित्त शनिशिंगणापूरमध्ये यात्रा भरली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच शनिअमावस्या आल्याने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. शनिवारी पहाटे अमावस्या सुरू झाली असून रविवारी पहाटेपर्यंत आहे. रविवारच्या सुट्टीला जोडूनच अमावस्या आल्याने मोठ्या संख्यने भाविक आले आहेत. शनिवारी पहाटे पर्व काळात शनी महाराजांची मुख्य महाआरती ऑस्ट्रेलियातील शनिभक्त राकेशकुमार आणि शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शनी महाराजांच्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

फटाक्यांच्या अतिषबाजीने यात्रेला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. आतापर्यंत लाखो भाविकांनी शनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळपासून दर्शनासाठी गर्दी वाढल्याने मंदिराच्या महाद्वारापासून रांगा लागल्या होत्या. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिराकडे येणारे सर्व रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले होते. मंदिरापासून दोन किलोमीटरवर वाहनतळ उभारण्यात आले होते. शिर्डीकडून येणारी वाहने मुळा कारखान्याजवळ थांबवण्यात आली होती. तर पुणे-नगर-संभाजीनगर महामार्गावरिल वाहने ग्रामीण रुग्णालयाजवळ थांबवण्यात आली होती.

यात्रेसाठी गर्दी झाल्याने शनीच्या मूर्तीजवळ गोंधळ उडत होता. भाविकांच्या रेटारेटीमुळे भाविकांना चौथऱ्याखालूनच दर्शन घ्यावे लागले. राज्य व परराज्यातील सुमारे तीन लाखांहून आधिक भाविक दर्शनासाठी आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात्रेनिमित्त कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा काळात काही दुचाकी आणि प्रवासी वाहतूक करणारी वाहने थेट मंदिराकडे सोडण्यात येत असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. भाविकांकडून पैसे घेऊन वाहने मंदिराकडे सोडले जात असल्याने पायी भक्तांना त्रास सहन करावा लागला. पोलिसांच्या चिरीमिरी घेऊन परवानगी दिल्याचे दिसले .