
अडचणीत सापडलेल्या महिलांना तत्काळ मदतीचा हात मिळावा यासाठी पोलिसांनी 103 आणि मुंबईबाहेर 112 हा हेल्पलाइन नंबर कार्यान्वित केल्यानंतर महिला आयोगदेखील लवकरच नवीन हेल्पलाइन नंबर सुरू करणार आहे. लक्षात राहावा आणि पटकन डायल करता यावा यासाठी नवा टोल फ्री नंबर सहा अंकी असणार आहे.
लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, ओळखीच्यांकडून होणारी पिळवणूक अशा अडचणीत सापडलेल्या महिलांना झटपट मदत मागता यावी यासाठी राज्य महिला आयोगाची ‘सुहिता’ ही टोल फ्री हेल्पलाइन कार्यान्वित आहे. मात्र हा हेल्पलाइन क्रमांक 7477722424 असा दहा अंकी आहे. पोलिसांचा हेल्पलाइन नंबर तीन अंकी असल्याने तो लक्षात ठेवण्याबरोबर पटकन डायल करणे सोयीचे ठरते. याच धर्तीवर महिला आयोगानेदेखील आपला टोल फ्री हेल्पलाइन नंबर कमी अंकी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही तांत्रिक बाबींचा अडथळा दूर झाल्यानंतर आयोगाच्या वतीने नवीन टोल फ्री नंबर महिलांसाठी सुरू करण्यात येणार असून 155209 असा तो नंबर असणार आहे.
दहा अंकी नंबर लक्षात ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तो डायल करणे बऱयाचदा महिलांना कठीण होते. ग्रामीण भागातील महिलांची तर खूपच गैरसोय होते. यामुळे महिला आयोगाचा टोल फ्री नंबरदेखील अधिक सुटसुटीत व सोयीचा व्हावा म्हणून तो सहाअंकी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तो सुरू होईल आणि महिलांना हे फायद्याचे ठरेल, असे आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.


























































