…तरीही सावध संचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती उत्सवापासून दिवाळीपर्यंतचा काळ गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी बराच बरा होता. कोविडने लादलेले सगळेच निर्बंध उठलेले नसले (आणि तसे ते उठवणं शक्यही नव्हतं) तरी गतवर्षीच्या मानाने जनजीवनात बराच मोकळेपणा आलेला दिसतो. हिंदुस्थानातच नव्हे, तर जगातल्या अनेक देशांतली अनेक क्षेत्रांतली बंद कवाडं खुली होत आहेत. दुकानं, मॉल, थिएटर आणि दळणवळणाच्या गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. जगभर मोठय़ा प्रमाणावर झालेलं कोविड रोखण्यासाठीचं लसीकरण आणि काही अपवाद वगळता जगाने पाळलेली आरोग्यविषयक स्वयंशिस्त यांचा हा एकत्रित परिणाम आहे. लोकहितार्थ, सरकारने काही निर्बंध जारी केले तर त्याला प्रतिसाद देणं हे नागरिकांचंही कर्तव्य असतं आणि ते दायित्व जनतेनेही चांगल्याप्रकारे निभावलं असंच म्हणावं लागेल.

याचं कारण ‘म्हणजे कधी न देखिला’ असा अपूर्व महामारीचा फेरा आपल्याकडे 2020च्या आरंभी दार ठोठावू लागला तेव्हा सारं जगच भांबावलेलं होतं. प्रगत म्हणवणारे देशच पहिल्यांदा या रोगाच्या सपाटय़ात सापडले. चीनमध्ये जन्मलेला कोविड किंवा कोरोनाचा विषाणू आधी इटली-स्पेन आणि मग साऱ्या युरोपात फैलावला. निमित्त झालं होतं ते इटली आणि स्पेनमधल्या फुटबॉल सामन्याच्या गर्दीचं. चीनमधून आलेल्या काही कोविडबाधित प्रेक्षकांनी या गर्दीत संसर्ग पसरवला आणि बघता-बघता अवघी पृथ्वी कोविडच्या कवेत गेली. उत्तर ते दक्षिण गोलार्धातील सर्व देशांना त्याची धास्ती वाटू लागली. प्रत्येकाने आपल्या सीमा, दळणवळणासाठी बंद केल्या.

त्या संभ्रमाच्या पहिल्या फेरीत, त्यावरचा उपायच जगाला ठाऊक नव्हता. रोग वेडय़ासारखा फैलावतोय आणि आधुनिक म्हणवणाऱ्या जगाकडे त्यावरचं औषधच नव्हतं! अशी काही असाधारण परिस्थिती आपल्या आयुष्यात उद्भवेल असं सत्तर, ऐंशी पावसाळे पाहिलेल्यांनाही कधी वाटलं नव्हतं. परंतु वैद्यकशास्त्र्ाालाही चकवा आणि आव्हान देणारे ‘व्हायरस’ (विषाणू) गेल्या दोन-अडीच दशकांत पृथ्वीवर ठाण मांडून आहेत. कधी एड्स, कधी मेर्स. नंतर सार्स आणि आता कोविड – 19 असा हा विषाणू प्रभावाचा चढता आलेख. त्यात कोविडने तर पुरते हैराण केले. गरीब, श्रीमंत कोणाचीच त्यातून सुटका नव्हती. जशी काही गेल्या दोन वर्षांत जगावर केवळ जुलमी कोविडचीच ‘सत्ता’ होती. प्रगत देशही भयभीत झाले होते.

ही अंधारयात्रा कधी संपेल याचा भरवसा नव्हता. सणांचा देश असलेल्या आपल्या उत्सवी देशात, 2020 मधले सगळे सोहळे चिडीचूप झाले. अर्थात त्याला इलाजही नव्हता. अनामिक धास्तीच्या आवरणाखालचा वावर आणि आनंद व्यक्त करायलाच नव्हे तर परस्परांना दिलासा द्यायलाही भेटीगाठींची सोय नाही असा विचित्र काsंडमारा आपण सर्वांनीच सहन केला. कोणी परिचित, सुदृढ गमावल्याचं दुःखही मूकपणे गिळावं लागलं. हे सामूहिक दिव्य संपूर्ण मानवी जगताने केलं. या भावविवश करणाऱ्या क्षणांबरोबरच अनेकांचे रोजगार जाऊन, दोन वेळच्या अन्नाची विवंचना निर्माण झाली. संपर्प बंदीच असल्याने कोणी कोणाला मदत करणं कठीण होतं. सरकारवरच सारा भार पडला. या कठीण काळातून आयुष्याची दीपावली पुन्हा सुरू होतेय.

हेसुद्धा शक्य झालं ते आरोग्यसेवक, सुरक्षासेवक आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या सर्वच धीरोदात्त कोविड ‘योद्धय़ां’मुळे! त्यांच्याविषयी जग सतत पृतज्ञ राहील. त्याचबरोबर संशोधकांनी या भीषण महामारीला पायबंद घालणारी लस विक्रमी वेळात लोकांपर्यंत आणण्याची क्षमता दाखवली. वास्तविक एखादी लस अनेक वर्षांच्या निरीक्षण, परीक्षणानंतरच सिद्ध होते; परंतु यावेळी तेवढा वेळच नव्हता, कारण ‘काळ आला जवळी ग्रासावया’ अशी जगाची अवस्था झाली होती. त्यामुळे चर्चाचर्वण, मतभेद, शंका-पुशंका निर्माण झाल्या तरी अखेर लस-मात्रा आल्या आणि त्या कोटय़वधी लोकांनी घेतल्या. महामारी आटोक्यात येण्यासाठी त्याचा वाटा मोठाच आहे. आता पुढे वेगळा ‘स्ट्रेन’ किंवा तिसरी लाट येईल का, याची टांगती तलवार आहेच. पण स्वयंशिस्त आणि धैर्याने त्याला सामोरं गेल्यास मानवीसमाज सामूहिकपणे त्यावर मात करेल. इतिहासकाळातही अनेक महासाथी माणसाने अनुभवल्या आहेत. अशा एखाद्या दुर्धर रोगाच्या अनुभवातून बाहेर पडताना सतत सावधचित्त असणे महत्त्वाचे. कोविडविषयक सार्वजनिक नियम अजूनही पाळणं (पंटाळवाणं असलं तरी) अत्यंत गरजेचं आहे हे लक्षात ठेवूया. सर्वसंचार वाढताना दिसतो आहे. पण तो सावधपणे करावा इतपंच.