
>>दिलीप जोशी
लोकशाहीर कृष्णराव साबळे यांनी कलेतून समाज जागृतीचं जीवनमूल्य जोपासलं. त्यांचं एका कार्यक्रमानिमित्त केलेलं चित्रण. ते आजही माझा ‘संचिता’चा अविभाज्य भाग आहे.
कार्यक्रम ऐन रंगात आला होता. 80 वर्षांचे शाहीर कृष्णराव साबळे तरुणाच्या तडफेने एकामागून एक गीतं सादर करीत होते. मराठी मन चेतवणारी त्यांची ती गाणी श्रोत्यांच्या मनात घर करून होतीच. त्याचा पुन:प्रत्यय प्रत्येक जण घेत होता. स्वातंत्र्य संग्राम, सामाजिक चळवळी, संयुक्त महाराष्ट्राचा लढा अशा अनेक मोहिमांमध्ये आपल्या शाहिरी कवनाने महाराष्ट्र गाजवलेल्या शाहिरांच्या शब्दाशब्दांतून कधी ठिणग्या फुलत होत्या, तर कधी मराठी मनाची वेदना उसळत होती. असंच एक गीत गाता गाता शाहीर भावनाविवश झाले. हातातला कागद टाकून तडक आत बॅकस्टेजला निघून गेले! मी कार्यक्रमाचं निवेदन करत होतो. शाहिरांचे मंचावरचे सहकारी आणि प्रेक्षकही स्तिमित झाले. प्रसंगावधान राखून मीही शाहिरांच्या पाठोपाठ विंगेत गेलो. कोणीच काही बोलत नव्हतं. त्यांच्या खुर्चीजवळ बसत मी म्हणालो, “बाबा, तुमच्या गाण्यांमधून एवढी वर्षे तुम्हीच महाराष्ट्र गाजवला आणि जागवला ना! मग तुम्हीच असं भावविवश होऊन कसं चालेल? चला बाहेर लोक वाट बघतायत.”
शाहिरांनी एकवार माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, “चल…” आम्ही स्टेजवर येताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. प्रेक्षकांत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखही होते. शाहिरांनी एकामागून एक अशी सरस लोकगीतं सादर केली.
2002च्या फेब्रुवारी महिन्यातली ही गोष्ट. ‘चित्रलेखा’ साप्ताहिकाने गणेशोत्सवातील देखाव्यांना पारितोषिकं देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण आणि लोकशाहीर कृष्णराव साबळे यांच्याशी संवाद
साधण्याविषयी संपादक ज्ञानेश महाराव यांनी मला विचारलं. हा माझाच सन्मान होता. पूर्वार्धात सुलोचनाबाईंनी मुलाखतीसह अनेक लावण्या सादर केल्या आणि उत्तरार्धात शाहीर स्टेजवर आले. दोन्ही दिग्गजांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांची भेट घेतली होती. दोघांनाही संत गाडगेबाबांच्या आवाजातल्या कीर्तनाची कॅसेट दिली. सुलोचनाबाईंनी गाडगेबाबांना गिरगावात पाहिलं होतं, तर शाहीर म्हणाले, “अरे, त्यांनी मला जवळ घेऊन आशीर्वाद दिला होता…” अशा पूर्वतयारीच्या गप्पांमधून कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आणि त्या कार्यक्रमाचं चित्रीकरण ‘चित्रलेखा’ने केलंच, पण माझ्या वहिनी सौ. उज्ज्वला देवधर यांनीही बराच भाग सभागृहातूनच चित्रित केला. ते चित्रण आजही माझा ‘संचिता’चा अविभाज्य भाग आहे.
आपल्या 91 वर्षांच्या प्रदीर्घ जीवनात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांनी समाज जागृतीचं जीवनमूल्य जोपासलं. वाईजवळच्या पसरणीसारख्या खेडय़ात त्यांच्या कानी बालपणीच अभंग-ओव्या आणि लोकगीतं येत होती. गोड गळय़ाचा कृष्णा ती आवडीने म्हणत असे. पुढे अमळनेरला मामांकडे शिक्षणासाठी गेल्यावर साने गुरुजींची भेट झाली. त्यांच्या देशभक्तीने कृष्णाला प्रेरणा मिळाली आणि गुरुजींकडून प्रोत्साहनही मिळत गेलं.
1947च्या मे महिन्यात साने गुरुजींनी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दलित बांधवांसाठी खुलं करावं म्हणून आमरण उपोषणाला सुरुवात केली. सारा महाराष्ट्रच नव्हे, तर देश ढवळून निघाला. अखेर गुरुजींच्या आत्मबळाचा जय झाले, मंदिराचे दरवाजे दलित बांधवांसाठी उघडले! त्यावेळी शाहीर साबळे यांच्या कवयित्री पत्नी भानुमती यांनी एक भावपूर्ण गीत लिहिले, ‘पावन झाली चंद्रभागा, कृतार्थ पांडुरंग। हरिजन भेटी हरी रंगला, पंढरी झाली दंग, झाला कृतार्थ पांडुरंग।।’ शाहिरांचं हे भावोत्कट गाणं जरूर ऐका. आमच्या कार्यक्रमात त्याविषयी बोलताना ते म्हणाले होते, “यात ‘पांडुरंग’ नावात दोन अर्थ आहेत. एक म्हणजे साक्षात विठ्ठल आणि साने गुरुजींचं नावही ‘पांडुरंग’ असंच होतं!”
अशा या स्मृती आज इतक्या वर्षांनी जागृत झाल्या त्या केदार शिंदे यांच्या आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहीर साबळे यांच्या जीवनपटामुळे. या ‘बायोपिक’मध्ये शाहिरांच्या भूमिकेत अंकुश चौधरी दिसणार आहे.
स्वत: शाहीर उत्तम अभिनेतेही होते. ‘यमराज्यात एक रात्र’, ‘आंधळं दळतंय’ या त्यांच्या लोकनाटय़ाचं ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ तर थेट पडद्यावर आली. नंतर खूप गाजलेले अभिनेते प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, भरत जाधव वगैरे त्यात नवतरुण कलाकार होते. शाहिरांचे चिरंजीव देवदत्त साबळे यांची गायक-संगीतकार म्हणून स्वतंत्र ओळख आहे, तर कन्या चारुशीला साबळे (‘वाच्छानी’) या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. केदार शिंदेसुद्धा शाहिरांचे नातू. तो वारसा त्यांनी यशस्वीरीत्या जोपासलाय आणि त्यांची मुलगी सना ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात तिच्या पणजीची म्हणजे भानुमती साबळे यांची भूमिका करतेय. पद्मश्री शाहीर साबळे पुन्हा एकदा पडद्यावरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. अजय-अतुल यांच्या उत्तम संगीताने नटलेला हा चित्रपट प्रेरणादायी असेल ही अपेक्षा!





























































