संगीतकार प्यारेलाल, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर, संजय राऊत यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगीतकार प्यारेलाल, अभिनेते प्रेम चोप्रा, नाना पाटेकर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, गायिका मीना मंगेशकर खडीकर यांना यंदाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱया पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. 24 नोव्हेंबर रोजी  दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

संगीत आणि कलेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (जीवन गौरव पुरस्कार) दिग्गज संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना त्यांच्या भारतीय संगीत आणि सिने उद्योगातील समर्पित सेवेसाठी घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्कार, तर दीनानाथ ‘विशेष पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका-संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांना देण्यात येणार आहे. प्रख्यात अभिनेते प्रेम चोप्रा यांनाही चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या समर्पित सेवेबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनाही रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील आयुष्यभराच्या सेवेबद्दल  मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. खासदार-राज्यसभा आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनाही पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल माला सिन्हा यांनाही विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.

साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा वागविलासिनी पुरस्कार संतोष आनंद यांना घोषित करण्यात आला आहे.  कवयित्री नीरजा यांना  कविता आणि साहित्यातील योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. प्रतीत समदानी, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबोळकर, डॉ. अश्विन मेहता, डॉ. निशित शहा आणि डॉ समीर जोग यांचा औषध आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.