ससून डॉकनजीक कुवेतची बोट सापडल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ससून डॉकसमोर मंगळवारी सकाळी कुवेतची बोट आढळल्याने खळबळ उडाली. मात्र त्या बोटीवरील तिन्ही व्यक्ती हे हिंदुस्थानी निघाले. बोटीच्या मालकाच्या जाचाला पंटाळून ते तिघे कुवेतहून त्या बोटीने मुंबईला पळून आल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. मात्र ही बोट अगदी मुंबईच्या किनाऱयापर्यंत आल्याने सागरी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई पोलिसांची ‘चैत्राली’ नौका नियमित सागरी गस्त घालत असताना त्यांना एक बोट संशयास्पदरीत्या फिरताना संक रॉक परिसरात ससून डॉकसमोर दिसून आली. तत्काळ नमूद बोट थांबवून तिची तपासणी करण्यात आली. तेव्हा सदरची बोट ही कुवेतची असून बोटीचे नाव ‘अब्दुला शरीफ- 1’ असल्याचे समजले. बोटीवर निटसो डिट्टो (31), इनफंट विजय अॅन्थोनी (29), जे. सहायंत्ता अनिष (29) हे तिघे होते. हे तिघेही मूळचे तामीळनाडूचे असून मासेमारीचे काम करतात. बोट ही विनापरवाना हिंदुस्थानी समुद्र हद्दीमध्ये मिळाल्याने व ती कुलाबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये असल्याने ‘चैत्राली’ नौकेवरील कर्तव्यास असलेले अंमलदार थोरात यांनी दक्षिण नियंत्रण कक्ष येथे संपर्क करून सदरची संशयित बोट व त्यावरील तिघांना कुलाबा मोबाईल- 1 यांच्या ताब्यात दिले.

बोट मालकाच्या जाचाला पंटाळून मायदेशी परतले
यलोगेट पोलीस ठाण्याचे निरीक्षक सावंत, सपोनि मदने, उपनिरीक्षक गायकर यांनी प्राथमिक चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, बोटीवर आढळलेले तिघेही मूळचे तामीळनाडूचे आहेत. दोन वर्षांपूर्वी कुवेत येथे ते अब्दुला शरीफ यांच्या बोटीवर मासेमारीचे काम करीत होते. बोट मालकाने त्यांना कोणत्याही प्रकारचा कामाचा मोबदला दिला नव्हता. त्यांना बोट मालकाकडून मारहाणदेखील केली जात होती. त्यामुळे त्यांनी मालकाकडे त्यांच्या पासपोर्टची मागणी केली . परंतु मालकाने त्यांना पासपोर्टदेखील दिले नाहीते. अखेर मालकापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी पुन्हा मायदेशी परतण्याचे ठरवून 28 जानेवारीला तिघेही कुवेत येथून त्यांच्या मालकाची ‘अब्दुला शरीफ-1’ ही बोट मालकाला न सांगता घेऊन निघाले व ते मंगळवारी सकाळी मुंबई येथे पोहोचले आहेत.