
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यामागची मुख्य भूमिका पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्याचा उद्देश असून शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवर भगवा फडकवण्याचे पाहिलेल्या स्वप्न पुर्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून शिवसेनेची सत्ता आणून सुरुवात करू या, यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना नेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते दिवाकर रावते यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने “माझी संघटना, माझा पक्ष” यानुसार शिवसेना पदाधिकारी यांचा संवाद मेळावा कराड येथे आयोजित केला होता. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, महेश शिंदे, अनिल बाबर, शिवसेना नेते दिवाकर रावते, सातारा सांगलीचे संपर्कप्रमुख नितिन बानुगडे-पाटील, माजी आमदार दगडूदादा सकपाळ, कोल्हापूर सिंधुदुर्गचे संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, प्रकाश आबिटकर, माजी जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, यशवंत घाडगे, जयवंत शेलार, सातारा उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार आदी प्रमुख उपस्थित होते.
दिवाकर दिवाकर रावते म्हणाले, इतर राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ते असतात. मात्र, शिवसेनेमध्ये शिवसैनिक असतात ते शिवसेनेवर तन, मन, धन अर्पून काम करतात. शिवसेनाप्रमुखांचे तत्व बाळगणारे शिवसैनिक तयार झाले आहेत. शिवसैनिक वैचारिक वैभव असणारे आहेत. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात भगिनी काम करतात. पश्चिम महाराष्ट्रातही याची संख्या मोठी आहे. शिवसेना नेहमी सकारात्मक बोलते आणि सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये निष्ठावंत शिवसैनिक तयार केले. हा शिवसैनिक लेचापेचा नाही. शिवसैनिक नेहमी जनसामान्यांच्या मदतीला धावणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवर भगवा फडकवण्याचे पाहिलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व बळकट व्हावे, असे आवाहनही शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केले.
सरकारच्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवर भगवा फडकवण्याचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्यरत राहून सरकारच्या माध्यमातून घेतलेल्या जनहिताच्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असेही शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.






























































