
सामना ऑनलाईन, कुडाळ
दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिवभक्तांनी किल्ले रायगडावर मशाली, पणत्यांचा प्रज्वलित करत संपूर्ण किल्ला तेजाने उजळवून टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भक्तांनी पहिला दिवा लावेन तर तो महाराजांच्या चरणीच असा निर्धार केला आहे. या निर्धारामुळेच दरवर्षी हे शिवभक्त न चुकता दिवाळीच्या पहिल्या दिवशी रायगडावर येतात आणि तिथे महाराजांच्या पुतळ्याजवळ दिवाळी साजरी करतात.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड या संस्थेच्या वतीने वसुबारस व गोवत्स एकादशीला शिवचैतन्य सोहळा आयोजित केला होता. यावेळी तब्बल ३४५ मशाली व पणत्या प्रज्वलित करुन किल्ले रायगड तेजोमय केला. महाराष्ट्राच्या विविध भागातून यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त जमले होते. ऐन दिवाळीमध्ये स्वराज्याची राजधानी अंधारात असते आणि ही सल प्रत्येक शिवभक्ताला असल्यानेच पहिला दिवा महाराजांच्या चरणी, त्यानंतर आपल्या दारी असा निश्चय करत गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. या सोहळ्याची सुरुवात शिरकाई देवीच्या पूजनाने केली. येथून सर्वांनी एक व्यक्ती एक मशाल याप्रमाणे मशाली प्रज्वलित केल्या आणि या मशालींच्या उजेडात तसेच ‘आम्ही मावळे ढोल ताशा’ पथकाच्या साथीने महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघाली. मध्यरात्री १२च्या सुमारास राजदरबारामध्ये पालखी आणल्यानंतर अवघा दरबार मशालींच्या उजेडात प्रकाशमय झाला. महाराजांचे पूजन झाल्यानंतर उपस्थित शिवशाहीरांनी रात्र जागवून रायगडावर पुन्हा एकदा ‘शिवशाही’चा अनुभव करुन दिला. यानंतर ४ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता रायगडावर दीपोत्सव सोहळा पार पडला. यावेळी ३४५ पणत्यांच्या उजेडात किल्ले रायगड उजळला. या रायगडावर आलेल्या शिवभक्तांनी गडावरील प्रत्येक घरामध्ये फराळाचे वाटप करुन त्यांनाही या उत्सवात सहभागी करून घेतले.
आकर्षक रोषणाई…
आम्ही मावळे संस्थेच्या प्रथमेश गव्हाणे आणि संदीप पिळके या तरुणांनी तब्बल ३-४ तासांची मेहनत घेत महाराजांच्या सिंहासनाचा परिसर उजळवला होता. यावेळी संपूर्ण मेघडंबरीला फुलांची सजावट करण्यात आली होती आणि त्यावर आकर्षक रोषणाई केल्याने हे नयनरम्य दृश्य या सोहळ्यात लक्षवेधी ठरले. दिवाळीला आपण आपल्या घरी रोषणाई करतो मात्र महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराज मात्र ऐव उत्सवात अंधारातच असतात ही सल बोचत असल्याने दरवर्षी शिवचैतन्य सोहळा आयोजित केला जातो असं श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.





























































