
सीमाभागात मराठी भाषिकांच्या अस्तित्व आणि हक्कासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा सुरू आहे. कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधातील उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये, असे पत्र महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवले आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांची लोकेच्छा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती या निवडणुकीत सहभागी होऊन बेळगाव ग्रामीण, दक्षिण, उत्तर, खानापूर, यमकनमर्डी व निपाणी या सात मतदारसंघांत निवडणूक लढवीत आहे. दरवेळी भाजप व काँग्रेसचे प्रतिनिधी सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तसेच मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन देत असतात, पण ऐन निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात कर्नाटकधार्जिण्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी बेळगावात दाखल होतात. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक नेत्यांना पाठवून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करून सीमावासीयांना दिलेल्या आश्वासनांचा विश्वासघात करण्याचा प्रकार वेळोवेळी दिसून येत आहे.
आतासुद्धा भाजपचे गिरीश महाजन, चित्रा वाघ व अन्य नेते बेळगावात ठाण मांडून प्रचार करीत आहेत, तर काँग्रेसचे प्रतिनिधीसुद्धा बेळगावात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे समस्त सीमावासीयांच्या वतीने भाजप व काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पत्र पाठवून सीमाभागात महाराष्ट्रामधून आलेल्या प्रतिनिधींना माघारी बोलवून घ्यावे. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोणत्याही उमेदवारांच्या विरोधात प्रचारात सहभागी होऊ नये, अशा सूचना देण्याच्या मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्राची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पत्रकाद्वारे दिला आहे.


























































