आज जिंकू किंवा मरू; हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यात रंगणार निर्णायक टी-20 सामना

हिंदुस्थान-न्यूझीलंड दरम्यान उद्या (दि. 1) सायंकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा अखेरचा तिसरा टी-20 क्रिकेट सामना म्हणजे ‘जिंकू किंवा मरू’ असा रंगणार आहे. न्यूझीलंडने पहिला सामना जिंकला होता, तर यजमान हिंदुस्थानने दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे मालिका कोण जिंकणार, याचा फैसला बुधवारी होणार असल्याने तिसऱया लढतीला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. उभय संघ तुल्यबळ असल्यामुळे अखेरच्या लढतीबद्दलची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.

 मालिका विजयाच्या हॅटट्रिकची संधी

यजमान हिंदुस्थानने न्यूझीलंडला टी-20 मालिकेत 2017 व 2021मध्ये पराभूत केलेले आहे. त्यामुळे उद्या अहमदाबादमध्ये न्यूझीलंडला हरविल्यास यजमान संघास मालिकाविजयाची हॅटट्रिक साजरी करता येईल. न्यूझीलंडने 2012मध्ये हिंदुस्थानला हिंदुस्थानात 1-0 फरकाने हरवून टी-20 मालिका जिंकली होती. त्यामुळे 11 वर्षांनंतर हिंदुस्थानमध्ये पुन्हा एकदा टी-20 मालिका जिंकण्यासाठी न्यूझीलंडचा संघही मैदानावर सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

 मालिका विजयाच्या चौकारासाठी हार्दिक सज्ज

हार्दिक पंडयाच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकदाही टी-20 मालिका गमावलेली नाहीये. हार्दिकच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने तीन टी-20 मालिका जिंकल्या आहेत. हार्दिकची सेना आता मालिकाविजयाच्या चौकारासाठी सज्ज झाली आहे. मात्र दुसऱया टी-20 लढतीत 100 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी हिंदुस्थानी फलंदाजांना अखेरच्या षटकापर्यंत वाट बघावी लागली होती. त्यामुळे न्यूझीलंडचा संघही तेवढय़ाच तयारीने मैदानावर उतरणार आहे, हे यजमानांना विसरता येणार नाही.

 चहलला सॅण्टनर, रशीद मागे टाकण्याची संधी

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलसाठी उद्याची लढत  खास ठरणार आहे. कारण चहलने 75 सामन्यांपैकी 74 डावांत गोलंदाजी करत 91 टी-20 बळी टिपले आहेत. न्यूझीलंडच्या मिचेल सॅण्टनरच्या नावावरही 91 टी-20 बळी आहेत. चहलने अहमदाबादमध्ये एक बळी मिळविला, तरी तो सॅण्टनरला मागे टाकणार आहे. पाकिस्तानच्या आदिल रशीदच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 93 बळी आहेत. म्हणजेत चहलला उद्याच्या लढतीत 3 बळी मिळाल्यास तो एकाच दिवशी सॅण्टनर व रशीदला मागे टाकू शकतो.

 उभय संघ  हिंदुस्थान शुभमन गिल, इशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंडय़ा (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, शिवम मावी.

न्यूझीलंड फिन एलन, डेवोन कॉन्वे, डेन क्लीवर (यष्टिरक्षक), डेरिल मिशेल, मायकल ब्रेसवेल, मिशेल सॅण्टनर (कर्णधार), मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, ईश सोढी, ब्लेयर टिकनर.