
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे,[email protected]
डॉ. अरुणा ढेरे… नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष…
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी गुरुभगिनीच्या वाचकांना माहीत नसलेल्या गुणगोष्टी जागवल्या.
यवतमाळ येथे आयोजित होणाऱया अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची एकमताने निवड झाली. निवडणुकीशिवाय प्रथमच सर्वसहमतीने अध्यक्ष निवडला गेला. संपूर्ण साहित्य विश्वाने या निवडीचे स्वागत केले. मला विशेष आनंद झाला कारण माझी मैत्रीण, गुरूंची कन्या, माझी गुरुभगिनी अध्यक्ष झाली. नजरेसमोर 1978 पासूनच्या दीर्घ मैत्रीचा एक चलत चित्रपट उभा राहिला. सोनचाफ्याच्या फांदीत हिरव्यागर्द पानात सोनचाफा शोधावा लागतो. अरुणासारखी काही माणसं या पानाआडच्या फुलासारखी असतात. आठवडय़ाला कुठे ना कुठे कवितांचा जाहीर रतीब टाकणाऱया कवी-कवयित्रींसारखी अरुणा नाही. मुळात तिचा स्वभाव संकोची आहे. ‘स्व-पणन’ संस्कृतीच्या आजच्या युगात ती एकदम मिसफिट!
27, 28 ऑक्टोबरला अरुणा आणि मी उदयपूर येथे ‘कथन काव्य आणि लोकनाटय़ परंपरा’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रासाठी गेलो होतो. त्याचदरम्यान अध्यक्षपदाच्या हालचाली सुरू होत्या. तिने मला सांगितले, ‘‘सगळेच लोक खूप आग्रह करताहेत, पण मी स्पष्ट शब्दांत नाही म्हणून सांगितले.’’ तिचा नकार मला रुचला नव्हता. मी भांडणाच्या आवेशातच म्हणालो, ‘‘तुझा निर्णय चुकीचा आहे. तू नाही म्हणू नकोस. अण्णा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नाहीत. पण अण्णांच्या साहित्यविषयक, संशोधनविषयक परंपरेचा हा सन्मान आहे. आपल्या लोकसाहित्य, लोकसंस्कृतीविषयक चळवळीचा हा सन्मान आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ गळय़ात पडल्यावर आपण अधिकाधिक लोकाभिमुख होतो. असे लोकाभिमुख होणे म्हणजे काही महत् पातक नव्हे. तू अजूनही हो म्हण.’ अरुणाच्या डोळय़ांत पाणी तरळले. ती म्हणाले, ‘‘प्रकाश, माझं टेम्परामेंट अध्यक्षपदाचे नाही. लोकांत नव्हे, एकांत घेऊन मी जगते. मला विलक्षण संकोच वाटतो. अवघडल्यासारखे होतं.’’ शेवटी आमची चर्चा अर्धवट राहिली आणि 28 ऑक्टोबरला ती मुंबईला पोहोचल्यावर तिचा मॅसेज आला. ‘‘झालं तुझ्याच मनासारखं. सर्वांनी खूपच आग्रह केला. शेवटी नाइलाज झाला. वर्तमानपत्रांत नाव प्रसिद्ध झाले. मी हो म्हटले. तुझे अण्णा आज हयात असते तर म्हटले असते, प्रकाश बघ, आपली अरुणा कशी अध्यक्षपदाच्या मखरात बसलीय?’’ माझे डोळे पाणावले आणि मी भूतकाळात डुबकी मारली.
या सर्वात अण्णांच्या म्हणजे ढेरे सरांच्या सर्वात जवळचा मी. नामदेवाचा हट्ट विठ्ठल पुरवायचा तसे माझे चहासह सर्व हट्ट ढेरे सर पुरवायचे. पंढरपूरच्या विठोबापासून नारायणगावच्या विठाबाईपर्यंत अनेक विषयांवर मी अण्णांशी गप्पा मारायचो. विशेष म्हणजे त्या गप्पांतही ती त्यांना सापडलेले संदर्भ द्यायचे. मारामारीचे चित्रपट हा माझ्याइतकाच अण्णांचा जिव्हाळय़ाचा विषय. अरुणा ही सर्व गप्पाष्टके एन्जॉय करायची. तिचा कल कवितेकडे, पण लोकसंस्कृतीचे धार आणि काठ यांची उत्तम जाण तिला होती. तिच्या संशोधनपर लेखनाला लालित्याची बैठक असायची. आम्हा सर्वांचे कान अण्णांच्या श्रवणातून तयार झालेले असायचे. त्यामुळे लोकसाहित्यात कुठे साजरे गोजरे गहिवर सुरू झाले की, आमचे डोळे आश्चर्याने विस्फारले. आयुष्याकडे करीअर म्हणून पाहणे अरुणाला जमले नाही. करीअर. त्यातील महत्त्वाकांक्षा, स्पर्धा, संवाद, विसंवाद यापेक्षा ती शेकडो योजने दूर राहिली. अनाग्रही राहिली, कृष्णकिनारे शोधत राहिली. राधा, रुक्मिणी, सत्यभामा, कृष्ण, राम, सीता आदी देवतांच्या अलौकिकत्वातले लौकिकत्व कवितांमधून रेखाटत राहिली. राधा, कृष्ण आणि रुक्मिणी यांचे संबंध आणि ‘सिलसिला’ चित्रपटातील जया, अभिताभ, रेखाचे संबंध हा माझा आणि अरुणाचा चर्चा आणि चिंतनाचा विषय. त्यात मग विठ्ठल, राही, रखुमाबाई आणि संत जनाबाईही डोकवायची. अलवार चिंतन आम्हा दोघांना आवडायचे. आजही आवडतं. माझ्या भावुकतेला वाट करून देत माझ्या लग्नात तिने मला पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’ कादंबरी भेट दिली तेव्हा तिने त्यावर लिहिलं होतं, ‘‘तुझी सावित्री तुलाच.’’
पुणे विद्यापीठातील काही काळ केलेली नोकरी अथवा भारती विद्यापीठातल्या सावित्रीबाई फुले अध्यासनाची काही काळ स्वीकारलेली जबाबदारी वगळता अरुणाने कोणतीही नोकरी केली नाही. अर्थाजर्नाची चिंता केली नाही. कविता, ललित लेखन, संशोधनपर लेखन, अण्णांच्या संशोधन दौऱयात त्यांच्यासोबत सातत्याने सावलीसारखे राहून केलेली भटकंती, या भटकंतीच्या शिदोरीवर शब्दबद्ध केलेली लोकसंस्कृतीची अललित रंगरूपे हा अरुणाचा ध्यास राहिला.
सदा डुंबरे, अरुण खोरे, सुभाष नाईक ही आम्हा ज्येष्ठ पत्रकार मित्रांचे गप्पांचे फड लोकसाहित्य परिषदांमध्ये अथवा एखाद्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात रंगत. अरुणासोबत या गप्पांच्या फडांना अधिकच रंगत येत असे. अरुणा संमेलनाध्यक्ष झाल्यावर सदा डुंबरे यांनी अतिशय उत्कट पत्र तिला लिहिलं, ‘‘कॉलेज कन्या अरुणा ते संमेलनाध्यक्ष अरुणा, आता तू दुर्गा झालीस. केवढी मोठी झालीस. अण्णांचे जीवन निरपेक्ष, निरलस, साक्षेपी, मूल्य संस्कारित. ते सर्व तुला भरभरून मिळालं. अण्णा स्वायत्त संस्था होते. अण्णांचा अंतःप्राण असलेली तू आहेस अरुणा.’’
अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक कधीच सामील झाले नाहीत. एकवेळ अरुणा अध्यक्ष होईल, पण अण्णा अध्यक्ष होणार नाहीत हे कटुसत्य एका भाषणात सदा डुंबरे यांनी व्यक्त केलं होतं. आज अरुणा साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली. बिनविरोध एकमताने हा दुग्धशर्करा योग. अरुणा, तुझ्या निवडीने सामाजिक सदसद्विवेकबुद्धीला लागलेली टोचणी, अपराधाची भावना निवळायला मदत होईल असे अरुणाच्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान असणाऱया आम्हा मित्रांना वाटते.
























































