साहित्य…राजकारण…समाजकारण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनेश पाटील

डॉ. मुरलीधर गोडे… गीतकार, महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री… दोन्ही वेगवेगळी कार्यक्षेत्र… पण मनाची तरलता, संवेदनशीलता आणि सच्चेपणा असला
की काहीच अशक्य नसतं…

‘मी कशाला आरशात पाहू गं?, मी कशाला बंधनात राहू गं?’, ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱयाची मंजूळ गाणी’ या सिनेसृष्टीतल्या तर ‘कानानं बहिरा मुका परी नाही’ या छोटय़ा पडद्यावर तुफान गाजलेल्या गाण्यांनी गेल्या तीन पिढय़ांवर अधिराज्यच केलं. या गाण्यांचे गीतकार आणि शेकडो साहित्य जन्माला घालणारे मुरलीधर गोडे हे कला, साहित्य क्षेत्रांत अदबीनं घेतलं जाणारं नाव. महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्षपद भूषवत कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळवून आपल्या लाल दिव्याच्या गाडीतून अख्खं राज्य पिंजून काढत साक्षरता प्रचारक म्हणून काम बघत हजारो प्रौढांना अक्षर ओळख करून देणारे मुरलीधर गोडे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळेदेखील विशेष ओळखले जातात.

साक्षरता हा केवळ शिक्षणाचा भाग न ठेवता त्यासाठी चळवळ उभी करणाऱया याच साक्षरता प्रसारकाचं एक पोर्ट्रेट टिपण्याची संधी मला एका नामांकित वृत्तपत्रामुळे मिळाली. ठरल्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गेलो. अत्यंत साधं, मात्र आपला ठसा समोरच्याच्या मनात खोलवर उमरणारं असंच मुरलीधर यांचं व्यक्तिमत्त्व. मुरलीधर यांच्याशी आधी साधारणपणे तास-दीड तास गप्पा झाल्या. विविध विषयांवर आम्ही मनमुराद बोललो. या वेळी त्यांच्या जीवनातील अनेक चांगले-वाईट प्रसंग त्यांनी सांगितले. त्यांनी आजवर निर्माण केलेली गीतं, पुस्तक आदींवर चर्चा झाली. ते सध्या ज्या संस्थांशी जोडले गेले आहेत त्या संस्थांविषयी, तिथल्या कामाविषयी आम्ही बोललो. यानंतर त्यांचं पोर्ट्रेट टिपण्याची तयारी मी केली. निरागस, प्रामाणिक आणि साधेपणा हे सगळं ज्या व्यक्तीकडे बघून बोलता येईल असंच मुरलीधर यांचं व्यक्तिमत्त्व आणि म्हणूनच तोच साधेपणा फोटोत टिपण्याची लगबग माझी सुरू झाली. दुःखाची, वाईट विचारांची किनार नसलेलं हे व्यक्तिमत्त्व टिपण्यासाठी सावली नसलेलं छायाचित्र मी टिपलं.
वयाची पंच्चाहत्तरी गाठलेले डॉ. मुरलीधर गोडे यांचं प्राथमिक शिक्षण ठाणे महापालिकेच्या शाळेत तसंच मोह विद्यालयात झालं. वडिलांच्या नोकरीमुळे काही काळ महाड येथे स्थायिक झाले होते आणि तिथूनच त्यांनी त्यांचं शालेय शिक्षणही पूर्ण केलं.

मात्र या शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण हे रुईया तसंच सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पूर्ण केलं. पुढे एमए संस्कृत, बीएड आणि प्रौढ शिक्षणावर पीएचडीची पदवी मिळवलेल्या गोडे यांनी शिक्षणाची चांगलीच शिदोरी आपल्याकडे जमा केली. मुंबई विद्यापीठात प्रौढ शिक्षण कार्यक्रम प्रमुख म्हणून प्राध्यापकाची तब्बल वीस वर्षे नोकरी केलेल्या मुरलीधर यांनी आपला वेगळा ठसा शिक्षण, पत्रकारिता, सिनेसृष्टी, साहित्य, रंगभूमी, लघुपट तसंच सामाजिक क्षेत्रातही चांगलाच उमटविला आहे. 1996 ते 1999 या सालाकरिता कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळवलेले गोडे हे महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष होते.

गोडे यांच्या हातून अनेक साक्षरतेसाठीची पाठय़पुस्तके, प्रशिक्षण मार्गदर्शिका, नवसाक्षरांसाठी पुस्तकांचं लिखाण झालं आहे. यातील दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कारही लाभला होता तर आजवर शंभरहून अधिक लेखन शिबिरांचं आयोजन केलेल्या गोडे यांनी अनेक पथनाटय़ांचं लिखाणदेखील केलं आहे. यातील निवडक दहा पथनाटय़ांचा संग्रह असलेलं लगोरी पथनाटय़ाची हे पुस्तकही नुकतेच प्रकाशित करण्यात आलं आहे.

आकाशवाणीकरिता गोडे यांनी 1968 ते 1998 या काळात शंभरहून अधिक संहिता विविध रचना बंधात लिहून त्या प्रसारित केल्या होत्या तर दूरदर्शनकरिता 95 संहिता तसंच चार शीर्षक गीतेही त्यांनी लिहिली आहेत. पंधरा अनुबोधपटांचं लिखाण आजवर गोडे यांच्या हातून झालं असून त्यांनी दोन लघुपटांचं लिखाणही दूरदर्शनकरिता केलं आहे. तसेच सुमारे वीस लघुपटांचं लिखाण गोडे यांनी राज्य शासनाकरिता केलं होतं. यातील सोन पावलं हा लघुपट त्यांचा चांगलाच गाजला होता. आकाशवाणी, टीव्ही यांच्याकरिता तब्बल पंन्नास जिंगल्सही गोडे यांनी लिहून आपल्या कलेचा वेगळा ठसा याही क्षेत्रावर उमटविला होता.

साहित्याची अमाप अशी निर्मिती करणाऱया याच कलाकाराने आजवर 13 चित्रपटांसाठी गीतलेखन करत आपली वेगळी छाप सिनेमासृष्टीवर पाडली आहे. बन्याबापू या तुफान गाजलेल्या मराठी सिनेमातल्या ‘लेलो भाई चिवडा लेलो…. गरम गरम मसालेदार चिवडा लेलो…’ या गाण्यापासून लिखाणास सुरुवात केलेल्या गोडे यांची अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय ठरली आहेत हे विशेष. किरण नाकती दिग्दर्शित सिंड्रेला या मराठी सिनेमासाठी मुरलीधर यांनी गाणी लिहिली होती तर आगामी ढोलताशा या सिनेमासाठीही त्यांनी पाच गाण्यांचं लिखाण केलं आहे.

साहित्य, सिनेमासृष्टी साक्षरता या क्षेत्रांत यशाची मोहर उमटवलेल्या गोडे यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना युनिसेफच्या स्पर्धेत उत्कृष्ट पथनाटय़ाचा पुरस्कार लाभला होता. तसेच आकाशवाणीच्या राष्ट्रीय स्पर्धेत गुणवत्ता प्रमाणपत्रानं गोडे यांचा गौरव करण्यात आला होता. याखेरीज अनेक स्थानिक संस्थांनी गोडे यांचा वेळोवेळी नागरी सत्कारदेखील केला आहे.