
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
[email protected]
वाचकाची इयत्ता उंचावणारं कमल देसाई यांचं लेखन. स्त्री, तिचं स्वतशी असणारं नातं, इतरांशी असणारं नातं, तिची सामाजिकता, तिच्यात असणारा आदिम अंश असं सारं कवेत घेणारी त्यांची कथा स्त्री केंद्रित आणि खरीखुरी स्त्रीवादी आहे.
काही लेखक हे लेखकांचे लेखक असतात. तशी एक लेखकांची लेखिका म्हणजे कमल देसाई. 1928 सालचा त्यांचा जन्म. मराठी हा विषय घेऊन त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि नंतर मराठीच्या प्राध्यापक म्हणून विविध ठिकाणी अध्यापन केलं.
1960 च्या दरम्यान सुप्रसिद्ध ‘सत्यकथा’ मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि त्यांचं अनोखेपण जाणकार वाचकांच्या नजरेत भरलं. अभूतपूर्व आशयाच्या आणि तितक्याच जबरदस्त मांडणीच्या त्यांच्या कथा, कादंबऱ्या समजून घेणं हा वाचकाची इयत्ता उंचावणारा प्रकल्प आहे. मोजकं आणि अत्यंत लक्षणीय लेखन करणारी ही लेखिका. त्यांचं वाचन प्रचंड आणि विविधतापूर्ण. कथा हा साहित्यप्रकार विलक्षण आवडीचा. त्यांचा तो श्वासच जणू. ‘मी कथा करते’ असं म्हणत त्या.
कोणत्याही विशिष्ट पंथाचा, संप्रदायाचा, प्रवाहांचा किंवा लोकप्रियतेचा गंडा त्यांनी कधी बांधून घेतला नाही. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, “मला स्वतंत्रपणे आयुष्य जगायचंय आणि मला माझं अस्तित्व प्रस्थापित करायचंय, ही गोष्ट मला लहानपणीच कळली होती.’’ याचा प्रत्यय त्यांच्या कथा, कादंबऱयांच्या नायिका देतात. त्या आपली स्वतची नैतिकता जपतात आणि प्रामाणिक असतात. मग इतर कुणी काही म्हणो. स्वत निवडलेल्या वाटेवरून चालण्याचं धैर्य त्या दाखवतात.स्त्री, तिचं स्वतशी असणारं नातं, इतरांशी असणारं नातं, तिची सामाजिकता, तिच्यात असणारा आदिम अंश असं सारं कवेत घेणारी त्यांची कथा स्त्री केंद्रित आणि खरीखुरी स्त्रीवादी आहे. मुद्दाम द्यावं असं उदाहरण ‘श्राद्ध’ कथेचं. मृत बहिणीला पाणी देणारी, तिचं श्राद्ध करणारी नायिका त्यात आहे. स्त्रीने – त्यातही कुमारिका स्त्रीने – अशा प्रकारचा कोणताही धार्मिक विधी करायला विरोध करणारा समाज आणि त्याच्या विरोधात बंड करणारी नायिका त्यात दिसते. पुरुषसत्ता स्त्रीचं जगणं नाकारते, अस्तित्त्व नाकारते, याविरुद्ध एक प्रकारचं बंड त्यांच्या नायिका पुकारतात. मी स्त्री-व्यक्ती आहे आणि स्त्री-व्यक्ती म्हणून जगणार…हा निर्धार त्यांच्या स्वतच्या व्यक्तिमत्त्वात होताच आणि तोच स्वाभाविकपणे त्यांच्या नायिकांच्या जगण्याचाही भाग झाला.
‘हॅट घालणारी बाई’ ही त्यांची गाजलेली लघु कादंबरी. या कादंबरीची नायिका निर्मितीचं, सर्जनाचं स्त्रीच्या जगण्यामध्ये स्थान काय, याचा शोध घेते आहे. यासंदर्भातलं तिचं चिंतन अत्यंत मूलभूत आहे. ‘हॅट घालणारी बाई’ची नायिका एक असा चित्रपट निर्माण करू इच्छिते की, वास्तवात तो अशक्यच आहे. ‘काळा सूर्य’सारखी अप्रतिम मिथक, कादंबरी त्यांनी लिहिली.
हे करताना काळ आणि अवकाश या संकल्पना त्यांनी फार विलक्षण तऱ्हेनं खेळवल्या आपल्या लेखनात. त्याचं कारण आहे त्यांच्या कथेतील फँटसी. त्या फँटसी जगल्या एका अर्थी आणि फँटसीला साहित्यात फार महत्त्वाचं स्थानही मिळवून दिलं त्यांनी. जसं जगणं तसं लिहिणं, असं फार कमी लेखकांत सापडतं. कमल देसाई तशा होत्या.
जादुई वास्तववाद, पात्रांची स्वगतं, त्यांच्या मनाच्या खोल आत उतरून तिथे चाललेल्या हालचाली टिपणं ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टय़ं. माणसाच्या असंज्ञ मनात काय घडतं त्याचा कसोशीने शोध त्यांनी सातत्यानं जारी ठेवला. त्यांचा भाषा वापरही विलक्षण होता. अत्यंत सघन, असंकेतिक. त्यामुळेच त्यांच्या कथा, कादंबऱ्यांची शीर्षकेही कमालीची वेगळी.
त्यांचं साहित्य हा एका अर्थानं माणसाच्या अंतर्मनाचा डोह आहे. त्याचं आकर्षण वाटतं आणि भयही वाटतं. भय कशाचं, तर आपल्याला हे सारं आकलन होईल का, झेपेल का याचं. त्याला कारणही तसं आहे. त्यांच्या लेखनातून दिसणारी अगदी स्व-तंत्र स्त्री पात्रं. त्यांचे अस्तित्त्वाविषयीचे प्रश्न, चिंतन. अशी स्त्री आपण समाजात पाहिलेली नसते. त्यामुळे तिला समजून घेण्याचे रस्ते आपल्याला ठाऊक नसतात. त्यांच्या निर्मितीनं काळाची आणि त्यापुची आव्हानं लीलया पेलली म्हणून त्यांच्या साहित्याच्या वाचनाचा व आकलन करून घेण्याचा आपला प्रयत्न जारी ठेवायला हवा.
‘गंगाधर गाडगीळ यांच्या नंतरची नवकथा’ असं त्याच्या कथेविषयी बोललं जात असे, ते उगाच नव्हे!
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)
























































