
पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू नशेबाजांना एमडीचा पुरवठा करणारा ड्रग्ज पेडलर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) जुहू युनिटच्या हाती लागला आहे. पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने अंधेरीत त्या तस्करावर झडप घालून सुमारे अडीच कोटी रुपयांचे एमडी जप्त केले.
अंधेरी परिसरात रेकॉर्डवरील आरोपी असलेला एक जण ड्रग्जची डिलिव्हरीसाठी येणार असल्याची माहिती जुहू एटीएसच्या अधिकाऱयांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक दया नायक, सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर आणि पथकाने आज अंधेरीच्या लल्लूभाई पार्क परिसरात सापळा रचून सोहेल मेमनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 5 किलो 65 ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले. जप्त केलेल्या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे अडीच कोटी रुपये इतकी आहे.
सोहेल वसई परिसरात राहत असून तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याला या पूर्वी 21 किलो एमडीप्रकरणी पालघर पोलिसांनी अटक केली होती. 22 महिने जेलमध्ये राहिल्यावर तो जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर बाहेर येताच तो पुन्हा ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय झाला. सोहेल हा पश्चिम उपनगरातील ड्रग्ज पेडलरला एमडीचा पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले.






























































