
सामना ऑनलाईन । कोलकाता
दारूच्या नशेत तर्राट असलेल्या एका महिलेने तिच्या मदतीला आलेल्या महिला पोलिसाच्या हाताचा चावा घेतल्याचे समोर आले आहे. कोलकात्यातील सॉल्ट लेक परिसरात ही घटना घडली असून त्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
37 वर्षीय ही महिला दारूच्या नशेत इतकी तर्राट होती की तिला चालणे देखील शक्य नव्हते. चालता चालता दोन रस्त्यांच्या मधील दुभाजकावर पडली. तिला त्या अवस्थेत बघून काही पादचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना सांगितले. त्यानंतर तत्काळ पोलीस तिथे पोहोचले व महिला पोलिसांनी तिला तेथून सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसांनी हात लावल्यामुळे ती महिला चिडली व तिने पोलिसांना शिव्या घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने दोन महिला पोलिसांचे चावे घेतले. त्यानंतर पोलिसांनी जबरदस्ती त्या महिलेला गाडीत बसवले व तिला रुग्णालयात भरती केले. तिथे तिच्या चाचण्या केल्यानंतर त्या महिले दोन ते तीन प्रकारची दारू प्यायल्याचे समोर आले.



























































