मुले पळवल्याच्या अफवेने शाळेत पालकांचा गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। वडवणी

मुले पळवणाऱ्या टोळक्याने जिल्हा परिषद शाळेतील काही मुलांना पळवून नेल्याच्या अफवेमुळे पालकांनी शाळेत गोंधळ घाटल्याची घटना माजलगांव तालुक्यातील दिंद्रुड येथे घडली आहे.

दिंद्रुड येथे मुले पळवणारी टोळी आली असून त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील काही मुलांना पळवले आहे. अशी अफवा बुधवारी दिंद्रुड गावात पसरली होती. त्यानंतर शेकडो पालकांनी शाळेत धाव घेतली. यावेळी पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातला. आपले पाल्य सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी पालकांनी शिक्षकांबरोबरही हुज्जत घातली. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन पुंडगे यांनी तात्काळ जिल्हा परिषद शाळेला भेट देत पालकांचा संभ्रम दूर केला. त्यानंतर पालक शांत झाले.

यावेळी कुठल्याही अफवांवर जनतेने विश्वास न ठेवण्याचे आवाहन पुंडगे यांनी दिंद्रुड ग्रामस्थांना केले.मुख्याध्यापक राऊत यांनीदेखील अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठवण्याचे अवाहन पालकांना केले.