उकिरड्यांची नोंद रद्द करण्याची मागणी

274

पाटोदा (खूर्द ) ता. जळकोट येथे शासकीय जागेवर गेल्या कित्येक वर्षांपासून उकिरडे टाकण्यात आले आहेत. काही राजकीय लोक व पुढारी ग्रामसेवकाशी हातमिळवणी करुन शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनधिकृत उकिरड्यांची नमुना नंबर आठला घेतलेली नोंद रद्द करावी, अशी मागणी पाटोदा खूर्द येथील गंगाबाई अमृता गडकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

यासंबंधी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, जळकोट यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर उकिरडे व नमुना नंबर आठला केलेली नोंद काढण्यासाठी मी 17 सप्टेंबर रोजी पंचायत समिती, जळकोट कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले असता गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच पती, तंटामुफ्त गाव समितीचे अध्यक्ष यांनी नमुना नंबर आठला उकिरड्यांची असलेली नोंद रद्द करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते.

सदर उकिरडे ज्यांच्या नावावर आहेत अशा व्यक्तींवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करुन त्यांच्यावर कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नमुना नंबर आठला उकिरड्यांची असलेली नोंद रद्द करण्यासाठी ग्रामसेवक यांना आदेश द्यावेत. 8 दिवसांत ही कार्यवाही नाही झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर समोर आपण आमरण उपोषण करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रती प्रधान सचिव, महसूल विभाग, मंत्रालय (मुंबई ), जिल्हाधिकारी (लातूर ), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (लातूर ), तहसीलदार (जळकोट ) यांना देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या