दिवाळीची पहिली रोषणाई विराटने केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी 

हिंदुस्थानकडून पाकिस्तानकडे आणि पाकिस्तानकडून हिंदुस्थानकडे  जाणारा विजयाचा लंबक टीम इंडियाच्या  हद्दीत येऊन थांबला. शेवटच्या दोन षटकांत विराट कोहली त्या लंबकावर स्वार झाला आणि कठीण परिस्थितीत त्याला हिंदुस्थानच्या हद्दीत घेऊन आला.

दिवाळीची पहिली रोषणाई विराट कोहलीने केली. एकेकाळी तो धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या खेळाडूंचा बादशहा होता. मधल्या काळात त्याचं राज्य जातंय असं वाटत होतं. एशिया कपमध्ये त्याने पुन्हा ते परत मिळवायचा प्रयत्न सुरू केला. काल तो पुन्हा राजा झाला. त्याची 53 चेंडूंमधली 82 धावांची खेळी त्याच्या नव्या राज्याभिषेकाला साजेशी होती. त्याने पैकीच्या पैकी मार्क मिळवलेल्या पेपरचे सर्वच प्रश्न कठीण होते. पाकिस्तानची गोलंदाजी अत्यंत दर्जेदार आहे. मेलबर्न मैदानाची सीमारेषा लहान नाही.

हिंदुस्थानी फलंदाजीची सुरुवात दयनीय होती. तिशी जेमतेम ओलांडल्यानंतर 4 बळी गेले होते. त्यानंतर मोठय़ा भागीदारीची  गरज होती आणि धावांचा वेग वाढवायची. षटकामागे 12 धावांचा अपेक्षित रन रेट होता. तिथून त्याने लंबक फिरवायला सुरुवात केली. 10 चेंडूंत 3, मग 20 चेंडूंत 11 आणि मग 33 चेंडूंत 71 धावा. बघता बघता, रिक्षांची स्पोर्ट्स कार झाली. गिअर आधी पांडय़ाने वाढवला. मग विराटने.

लंबक हिंदुस्थानकडे वळण्याचा पाया घातला गेला. तरीही शेवटच्या दोन षटकांत तो लंबक पाकिस्तानी हद्दीत होता. 8 चेंडूंत 28 ही उडी सोपी नव्हती. समोर रौफ होता. अचूक टप्प्याच्या अलीकडून तो चेंडू वर आणतो. त्याला बॅकफूटवरून सरळ षटकार मेलबर्नच्या मैदानावर मारणं सोपं नाही. मागे एकदा गॅरी सोबर्सने मेकिफ याला आधी किंचित पुढे जात मग मागे येऊन षटकार ठोकला होता. ऑस्ट्रेलियात तो षटकार अजून आठवला जातो. हा विराटचा षटकार तसाच अविस्मरणीय होता. त्यापुढच्या चेंडूवर मारलेला षटकार त्याला स्वतःलाच आश्चर्यचकित करून गेला. ते दोन षटकार म्हणजे महान फलंदाज विचार कसा करतात याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. शेवटचं षटक पाकिस्तानला नवाजला द्यावं लागलं. तो दबावाखाली गेला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)


ते भरलेलं स्टेडियम, तो गोंगाट, समोर बादशहा कोहली आणि हिंदुस्थान-पाकिस्तान मॅचचा दबाव. तो कोसळला. कोहली जिंकला. अर्थात कोहलीइतकाच अर्शदीपचा पहिला स्पेलं, त्याची एपंदरीत गोलंदाजी, हार्दिक पांडय़ाचे 3 बळी महत्त्वाचे होते. अर्शदीपने पाकिस्तानच्या पायात पहिली गोळी मारली. आणि लंगडणारं पाकिस्तान घोडं  धावतंय म्हटल्यावर पांडय़ाने पुढची गोळी मारली. तरीही पाकिस्तानने 160 पर्यंत मजल मारली. तो पाठलाग त्यांची गोलंदाजी पाहता सोपा नव्हता. एका क्षणी तो हाताबाहेर गेलाय असं वाटलं, पण कोहलीने खेळीची सुंदर मांडणी केली. एकेरी, दुहेरी धावा जिवाच्या आकांताने धावला. पाकिस्तानविरुद्ध खेळताना ऐतिहासिक दबाव लोखंडाच्या चण्यासारखा असतो. ते त्याने लीलया खाल्ले, पचवले. भावनाविवश झाला. त्याच्या आयुष्यातली ती एक सुंदर रात्र आहे म्हणाला आणि आपल्या सर्वांना दिवाळीची एक अमूल्य भेट आणि तितकीच रोमहर्षक संध्याकाळ दिली.