
नाटय़ अभिनेता सनीभूषण मुणगेकर हा खवय्या आहे. पण स्वत: पाकसिद्धी करण्यापेक्षा आईला भाजी चिरून देणे, खोबरे खवून देणे जास्त आवडते.
‘खाणं’ या शब्दाची तुझ्यादृष्टीने व्याख्या काय? – माणसाला जगण्यासाठी ‘खाणं’ अतिशय गरजेचं आहे.
खायला काय आवडतं? – फळ, कंदमूळ, पालेभाज्या, दुधाचे पदार्थ, मासे मला खायला जास्त आवडतात. तेलकट पदार्थ टाळतो. थम्सअप, कोकोकोला मी कधीच पित नाही. त्यापेक्षा मोसंबी, सफरचंद अशा फळांचे रस प्यायला मला आवडतात. याबरोबच उष्ण पदार्थ खाल्ले तर आहारात काकडी, टोमॅटो, बीट अशा थंड फळ आणि पदार्थांचा समावेशही आवर्जून करतो.
खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेतोस? – फिटनेससाठी मैद्याचे आणि चणाडाळीचे पदार्थ म्हणजे पाव, बिस्किट, वडा पाव, भजी खाणे टाळतो. त्याऐवजी ओट्स बिस्किट, गव्हापासून बनवलेले बिस्कीट खातो. टाइमपास म्हणून काही जण च्युईंगम वगैरे खातात. याऐवजी माझा आवडता टाइमपास मी सुकामेवा खातो.
डाएट करतोस का? – बॅलन्स डाएट करतो. अति तिखट, तेलकट पदार्थ खात नाही. यामध्ये सकाळच्या नाश्त्यात उकडय़ा तांदळाची पेज, काही वेळा उकडलेलं अंड (एग व्हाईट), ऑमलेट असे पदार्थ असतात. दुपारच्या जेवणात वरण-भात, भाजी, पोळी पूर्ण आहार घेतो. आणि मांसाहाराच्या दिवशी मासेही खातो. दर दोन तासांनी थोडं थोडं पण दिवसभर खातो. कडधान्याची उसळ आणि पालेभाजी जेवणात असते. चहा, कॉफी पितच नाही.
आठवडय़ातून किती वेळा बाहेर खातोस? – दोन वेळा. तेही सँडविच खातो. कारण त्यामध्ये काकडी, टोमॅटो बीट असतं. वडापाव अगदीच क्वचित खाणं होतं.
कोणत्या हॉटेलमध्ये जायला आवडतं? – मी मत्स्यप्रेमी असल्याने दादरमधलं ‘गोमंतक’, ‘पूर्वपगंत’मधली तळलेली सुरमई मला आवडते.
कोणतं पेय आवडतं? – फळांचे रस मी नियमित पितो. शिवाय सोलकढी, ताक ही पेये आवडतात.
घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – आईच्या हातचं वरण-भात. यातही कोकणातल्या पद्धतीने आलं-लसूण, कांदा, खोबर, मिरची वाटून केलेलं वाटपाचं वरण मला प्रचंड आवडतं. मच्छी करीही आवडते.
स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी? – मॅगी, ज्यूस, फ्रूट सलाड स्वतः करतो. यापेक्षा आईला खोबरं खवून देणं, कोथिंबीर निवडणं, कांदा चिरणं, मासे स्वच्छ करून देणे अशा कामात मदत करायला मला नेहमीच आवडते.




























































