
सामना ऑनलाईन, मुंबई
आज संपाच्या तिसऱ्या दिवशी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकांकडे कामगारांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे लक्ष लागले होते. सकाळी 9 वाजता कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांची महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याबरोबर बैठक पार पडली. मात्र संप मागे घेतल्यानंतरच चर्चा करण्याची प्रशासनाची भूमिका होती, तर संप मागे न घेण्याबाबत शशांक राव ठाम होते. त्यामुळे या चर्चेतून काहीच निष्पन्न होऊ शकले नाही. त्यानंतर राज्याच्या म्ख्यु सचिवांकडे महाव्यवस्थापकांबरोबर बैठक पार पडली. दुपारी तीन वाजल्यापासून महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्तांबरोबर बैठक घेतली. संध्याकाळी उशिरा शशांक राव हे महापौर बंगल्यावर चर्चेसाठी आले.
बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, कर्मचाऱ्यांची ज्युनियर ग्रेड बदलून त्यांना मास्टर ग्रेडप्रमाणे वेतननिश्चिती करावी, सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा, पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा या मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी 8 जानेवारीपासून पुकारलेला संप मिटण्याचे नाव घेत नाही. आज सलग तिसऱ्या दिवशी चाललेल्या या संपामुळे बेस्टचे 9 ते 10 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे.
राव यांचा आडमुठेपणा
आपण कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करण्यासाठी जाणार नसल्याचे राव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे तिढा निर्माण झाला होता. मात्र संध्याकाळी उशिरा महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांचा सन्मान राखत शशांक राव हे चर्चेसाठी महापौर बंगल्यावर दाखल झाले. मात्र कामगार सेना संपात सहभागी नसल्यामुळे त्यांच्यासोबत चर्चेला बसण्यास राव यांनी नकार दिला. त्यामुळे संपाचा तिढा सोडवण्यासाठी कामगार सेनेच्या प्रतिनिधींना या बैठकीत बोलावण्यात आले नव्हते.
हायकोर्टात याचिका, आज सुनावणी
‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरू असून ही स्थिती कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वकील दत्ता माने यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यासमोर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, आम्ही योग्य प्रस्ताव ठेवला असून उद्या याबाबत कामगारांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन कामगार संघटना प्रतिनिधींनी सांगितल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. बेस्टच्या आर्थिक स्थितीची जाणीवही यावेळी संघटनांना करून दिल्याचे जाधव म्हणाले.
महापौर बंगल्यावर मॅरेथॉन चर्चा
बेस्टच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आज महापौर बंगल्यावर मॅरेथॉन चर्चा सुरू होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी साडेतीन वाजल्यापासून बैठक सुरू होती. महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालकमंत्री सुभाष देसाई हे या बैठकीला उपस्थित होते. साऱ्या मुंबईचे या बैठकीकडे लक्ष लागले होते.
मंत्रालयातील बैठकही निष्फळ
बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सचिवांनी महाव्यवस्थापकांना पाचारण केले होते. संध्याकाळी ही बैठक पार पडली, मात्र त्यात काहीच तोडगा निघाला नाही. त्यानंतर महाव्यवस्थापक हे महापौर बंगल्यावरील बैठकीसाठी रवाना झाले.
पालिका कर्मचाऱ्यांचाही संपाचा इशारा
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या संपाला मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या युनियननेही पाठिंबा दिला आहे. बेस्टच्या संपाबाबत त्वरित तोडगा न काढल्यास शनिवारी मुंबई महापालिकेचे सफाई, मलनिस्सारण, रुग्णालय तसेच इतर कर्मचारी आंदोलनात उतरतील, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे.



























































