व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे उघड केली तर अनेकांना हादरे बसतील, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

मी खालच्या पातळीचे राजकारण कधीच करत नाही. माझ्याकडे असलेल्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे उघड केली तर अनेकांना हादरा बसेल. मी पक्षाच्या वरिष्ठांना ते दाखवले आहे. त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन, असा इशारा देवेंद्र फडणवीसांच्या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळलेले भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपमधील पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणाविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील खडसे यांनी ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचे कारण नाही. जे काही होईल जनतेसमोर येईल, असे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बारभाई कारस्थानांचा पाढाच वाचला.

माझ्यावर जे आरोप केले ते विरोधकांनीही केले नाहीत, माझा राजीनामा विरोधकांनी मागितला नाही. पक्षातंर्गत ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर नैतिक पदावरून राजीनामा दिला. फडणवीस यांच्यावरही अ‍ॅक्सिस बँकेबाबत आरोप झाला, अन्य मंत्र्यांवरही आरोप झाले त्यांचे राजीनामे घेतले नाहीत. मला एक न्याय आणि दुसर्‍याला वेगळा न्याय का? माझ्या मुलीने तिकीट मागितले नसताना तिकीट दिले आणि तिला हरवण्याची व्यवस्था केली. याबाबत वेदना आणि खंत मनात नेहमी राहणार, असे खडसे म्हणाले.

थोडी तडजोड केली असती तर ही वेळ आली नसती

महाराष्ट्रात सरकार आले असते, पण मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे ही भूमिका घेतल्याने 105 जागा मिळूनही टाळ वाजवत बसावे लागले. दोन्ही पक्ष मिळून संख्याबळ होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर काय बिघडले असते. युती म्हणून निवडणूक लढवली, थोडी तडजोड केली असती तर ही वेळ आली नसती. मी पुन्हा येईन हे फक्त फडणवीस म्हणत होते. बाकी कोण म्हणत नव्हते, असा टोला खडसे यांनी लगावला.

राज्यपाल, राज्यसभेचे आश्वासन

मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटिचेंबरमध्ये बोलावून राज्यपालपदाची ऑफर दिली होती. तेव्हा मुलीची शपथ घेऊन तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठींची त्याला संमती असल्याचे त्यांनी सांगितले होते. राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला राज्यसभेत पाठवणार असल्याचे सांगितले, पण नंतर दुसरीच चार नावे आली. फडणवीस यांनी दिल्लीत पाठवलेल्या यादीला संमती देत नाही म्हणजे कुठेतरी गडबड वाटते, असे ते म्हणाले.