
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. खडसे सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका करत आहे. आपण प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी फडणवीस यांना मोठी मदत केली म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकले. पण, फडणवीसांनी व्यक्तीगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली. हे मला योग्य वाटत नाही, अशी खंतही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझा हात आहे. 2014 पूर्वी विधानसभेत मी जिथे बसायचो, त्याच्या पाठीमागील जागा मी फडणवीसांना दिली होती. विरोधी पक्षनेते असताना माझ्याऐवजी बोलण्याची संधी फडणवीसांना दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न त्यांनी उचलले. त्यांचे कौशल्यही त्यात होते, असे खडसे म्हणाले.
फडणवीस यांना आपण मदत केली. मात्र, नंतरच्या कालखंडात फडणवीसांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. पण, सुडाचे राजकारण महाराष्ट्राला शोभत नाही, अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीसांना सुनावले आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अन्याय झाला का असे विचारले असता खडसे म्हणाले की, विनोद तावडे सावरले आहेत. ते महाराष्ट्रातून दिल्लीला गेले आहेत. पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत. म्हणून त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतलेला नाही. मी निर्णय घेऊन वेगळी दिशा आणि मार्ग अवलंबला. पंकजा मुंडे यांना काही सल्ला देऊ अशी सध्या स्थिती नाही. पंकजा मुंडे परिपक्व आहेत, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.


























































