लोहा नगर परिषदेची निवडणूक ९ डिसेंबर रोजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

लोहा नगर परिषदेची निवडणूक ९ डिसेंबर रोजी होणार असून, काँग्रेस विरुध्द भाजपा अशी नगराध्यक्ष पदासाठी सरळ लढत होणार असून, शिवसेनेने पाच जागी आपले उमेदवार उभे केले आहेत.

शनिवारी या निवडणुकीचा प्रचार संपला. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभा शनिवारी लोह्यात झाल्या. ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत आठ प्रभागात भाजपाने १८, शिवसेनेचे ५, काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे ४ व इतर १५ असे ५८ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपद हे मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असून, भाजप, काँग्रेस, बहुजन विस्थापित आघाडी व अपक्ष असे चार उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपच्या वतीने गजानन सूर्यवंशी, काँग्रेसच्या वतीने सोनू संगेवार, बहुजन विस्थापित आघाडीच्या वतीने रमेश माळी व अपक्ष शिवाजी अंबेकर हे चार उमेदवार नशिब अजमावत आहेत.

रविवारी होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, शहरात २८ मतदान केंद्र आहेत. १८ हजार ९६२ मतदार या मतदानासाठी पात्र असून, २६ अधिकारी व १२४ कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत. सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी साडेसातशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस व प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. लोह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.