
सामना प्रतिनिधी, वडवळ नागनाथ
चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्रात गेल्या सोळा महिन्यांपासून प्रभारी अभियंताच असल्याने अनेक विज समस्या वाढल्या आहेत. या संदर्भात जनकल्याण सेवाभावी संस्थेने सात महिन्यांपूर्वी धरणे आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. यावेळी उपकार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासन देवुन जुन २०१८ अखेर पर्यंत अभियंता नियुक्त केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले. मात्र सहा महिने उलटले तरी अभियंत्याचे पद रिक्तच असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.
वडवळ नागनाथ येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातुन पंधरा गावचा कारभार चालतो. या उपकेंद्राअंतर्गत वडवळ नागनाथ सह परिसरातील जानवळ, वाघोली, खुर्दळी, कडमुळी, सेवापूर तांडा, ब्रम्हवाडी, शंकरनगर तांडा, फतुनाईक तांडा, बोकनगाव तांडा, महाळंगी, रायवाडी, राजेवाडी, रामवाडी, केंद्रेवाडी, आदी गावाचा कारभार चालतो. मात्र या उपकेंद्रात गेल्या सोळा महिन्यांपूर्वी येथील अभियंत्याची पदोन्नती झाल्याने वडवळ येथील सर्व पदभार घरणी येथील एस.आर. माने यांच्यावर सोपविण्यात आला आहे. परंतु माने यांना घरणी कार्यालयाचा कारभार हाकताना वडवळ उपकेंद्रातील वीज ग्राहकांच्या समस्याकडे पाहण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे. परिणामी ग्राहकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वडवळ नागनाथ येथील ३३ के. व्ही. उपकेंद्र अभियंत्याविना बकाल झाले आहे. वडवळ नागनाथ सह पंधरा गावच्या ग्राहकांनी कायमस्वरूपी अभियंत्याची मागणी करूनही महावितरण याकडे दुर्लक्षच करीत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. परिणामी कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंत्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थ तीव्र अंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.





























































