
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ वाढलेल्या जागतिक तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यातच रुपयावरील दबावामुळे आयात खर्चही वाढला असून, याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होत आहे. त्यामुळे वाहतूक उद्योगावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर बसू लागला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढत असून, त्याचा परिणाम भाजीपाला, धान्य, औषधे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. देशभरातील वाहतूकदार संघटनांनी मालवाहतुकीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याने महागाई आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
देशातील वाहतूकदारांची संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनने (AITWA) 20 मे पासून इंधन समायोजन घटक (FAF) लागू केला आहे. 15 मे रोजीच्या डिझेल दराला आधार मानून, डिझेलच्या किमतीत प्रति लिटर एक रुपयांची वाढ झाल्यास मालवाहतूक दरात आपोआप ०.65 टक्के वाढ होणार आहे. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे. वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवड्यांत डिझेल, टायर, टोल आणि इतर खर्चात मोठी वाढ झाली आहे. डिझेलचा वाहतूक खर्चातील वाटा जवळपास 65 टक्के असल्याने दरवाढ अपरिहार्य असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. टायरच्या किमतींमध्ये सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली असून, 1 एप्रिलपासून देशभरातील टोल दरही वाढले आहेत.
वाहतूकदारांच्या मते, मालवाहतुकीचा खर्च वाढत असतानाच मालाच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे उद्योग दुहेरी संकटात सापडला आहे. खर्च वाढ आणि कमी मागणी यामुळे वाहतूक व्यवसायावर मोठा ताण निर्माण झाला आहे. रस्ते वाहतूक ही हिंदुस्थानच्या पुरवठा साखळीचा कणा मानली जाते. मात्र, इंधन दरवाढ, तुटवडा आणि वाढते ऑपरेशनल खर्च यामुळे हा कणा कमकुवत होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, येत्या काळात महागाईचा आणखी मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




























































