
कारगिल युद्धापेक्षा अधिक बळी घेणाऱया कोरोना महामारीकडे तुमचे दुर्लक्ष का ? रोज हजारो नागरिक या आजाराला बळी पडत असताना तुम्ही निवडणूक प्रचार सभा, रॅलीज आणि धार्मिक मेळावे कसले आयोजित करता, असा संतप्त सवाल देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी राजकारणी आणि धार्मिक नेत्यांना केला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना सत्ताधारी अनावश्यक कार्यक्रमात दंग कसे राहू शकतात, असा प्रश्नही मलिक यांनी विचारला आहे.
देशातील वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 500 करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 1 हजार 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाही सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारसभा, शेतकरी आंदोलन आणि इतर कार्यक्रमांवर परखड टीका केली आहे.
आता तरी जागे व्हा
वेद प्रकाश मलिक यांनी देशात सध्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या प्रचारसभा, कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन यांचा उल्लेख करत नाराजी जाहीर केली आहे. निवडणूक प्रचारसभा, धार्मिक कार्यक्रम, शेतकरी आंदोलनांचा उल्लेख करत त्यांनी देशवासीयांना या संकटाच्या घडीत आता तरी जागे व्हा आणि कोरोनारूपी अदृश्य राक्षसी शक्तींविरुद्ध एकजुटीने आणि धैर्याने लढा, असे भावनिक आवाहन केले आहे.
‘देशात सध्या युद्ध सुरू आहे. 1338 हिंदुस्थानी नागरिकांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याआधी 1182 जणांचा झाला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांपेक्षा ही संख्या अडीच पट जास्त आहे. देशाने या युद्धावर लक्ष केंद्रित केले आहे.’
– जनरल वेद प्रकाश मलिक, माजी लष्करप्रमुख




























































