फलटणमधील तिघांच्या टोळीला मोक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फलटण येथील तिघांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (रा. मोती चौक, फलटण), विकास उर्फ लाल्या उर्फ कानिफनाथ अनिल जाधव (रा. बावधन, ता. वाई), हिमालय सतीश धायगुडे (रा. खेड बुद्रूक, ता. खंडाळा) अशी टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

सोळशी परिसरात डोंगरातील पवनचक्कीसाठी तयार केलेल्या रस्त्याने 25 फेब्रुवारी रोजी एक दाम्पत्य केदारेश्वर मंदिराकडे जात होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

तपासामध्ये हा गुन्हा महेश शिरतोडे, विकास जाधव, हिमालय धायगुडे यांनी केल्याचे समोर आले. या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांनी संघटितपणे फलटण ग्रामीण, फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर, सातारा तालुका, महाबळेश्वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा तसेच पुणे जिह्यात बारामती पोलीस ठाणेहद्दीत महामार्गावर व इतर जोडरस्त्यांवर अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. मोक्काच्या प्रस्तावाला कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिल्यानंतर संबंधित गुह्यात मोक्काचे कलम लावण्यात आले आहे. सातारा ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे तपास करीत आहेत.

पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार प्रवीण शिंदे, पोलीस नाईक सचिन जगताप, वाठार पोलीस ठाण्याचे तानाजी चव्हाण यांनी या कारवाईत भाग घेतला.