
सामना प्रतिनिधी, बीड
कर्ज माफी झाल्याचे पत्र पाठवून आपल्या हिश्श्याची रक्कम भरण्याचे आदेश दिलेल्या स्टेट बँकेने बँकेत आलेल्या शेतकऱ्याची कशी खिल्ली उडवली याचे वृत्त सामना ऑनलाईनवर प्रकाशित झाले होते. या वृत्तानंतर मुंबईहून बँकेचे वरिष्ठ अधिकारी वडवणीत दाखल झाले आणि शेतकऱ्याला सन्मानाने बोलावून घेत अवघ्या अर्ध्या तासात कर्जमाफी दिली गेली.
वडवणी जवळील कान्हापुर येथील शेतकरी कारभारी लवटे यांना स्टेट बँक व्यवस्थापकाच्या सहीचे एक पत्र गेले होते. या पत्रात आपणास छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. आपली कर्ज माफी झाली आहे. एक लाख एकवीस हजार चारशे रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या हिश्श्याची 8 हजार 532 रु भरणा करा आणि माफीमध्ये या. तसेच नवीन पीक कर्ज उचलून बँकेच्या आकर्षक पीक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे पत्र देण्यात आले. आजारी असलेले आणि बायपास शस्त्रक्रिया झालेले कारभारी लवटे आजारी असताना आपल्या हिश्श्याची रक्कम भरण्यासाठी बँकेत गेले. मात्र तिथे उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली होती. तसे अजून काही ठरले नाही पुन्हा बघू म्हणत शेतकऱ्याची खाल्ली उडवली होती. आधीच बायपास झाली आजारी असताना बँकेच्या रांगेत उभा राहून अखेर या शेतकऱ्याला पिटाळून लावल्याने या शेतकऱ्याचा रक्तदाब वाढला होता. बँक अधिकारी शेतकऱ्याशी कसे वागत आहेत, अधिकाऱ्यांच्या मनमानीचा फटका कसा शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांना अपमानित केले जात आहे याचा पर्दाफाश करणारं हे वृत्त सामना ऑनलाईनमध्ये प्रसिद्ध झाले होते.
सामनामध्ये वृत्त प्रकाशित होताच बँक हादरली. त्या हादऱ्याचे धक्के मुंबईपर्यंत पोहोचले आणि सोमवारी सकाळी जनरल मॅनेजर बलदेव प्रकाश, डिप्युटी जनरल मॅनेजर रवी कुमार, क्षेत्रीय व्यवस्थापक संजय चामणीकर, वडवणीचे शाखा व्यवस्थापक मयुर काशीद, वडवणी फिल्ड ऑफिसर भानु प्रताप असे सर्व अधिकारी वडवणीत दाखल झाले. त्यांनी खिल्ली उडवलेल्या कारभारी लवटे यांना सन्मानाने बोलावून घेतले. त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. त्यांच्याकडून उर्वरित आठ हजार रुपये भरून घेत अवघ्या अर्ध्या तासात त्यांची कर्जमाफी करून टाकली.
लवटे यांना अश्रु अनावर…….
खरंच आपली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत कर्जमाफी झाली याची खात्री पटल्यानंतर कारभारी लवटे यांनी न्याय मिळवून देणाऱ्या सामनाचे आभार मानले. सामनामुळे मला सन्मानाने कर्ज माफी मिळाली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. भावना व्यक्त करताना कारभारी लवटे याना आपले अश्रू अनावर झाले होते.





























































