
सामना प्रतिनिधी । चंदगड
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील उमगाव पैकी माळी येथे जंगली अस्वलाच्या हल्ल्यात यशवंत गावडे (55) हा शेतकरी गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी संध्याकाळी गावडे हे आपल्या शेतातील काजूची बाग स्वच्छ करण्यासाठी गेले असता झुडपात लपलेल्या अस्वलाने पाठीमागून हल्ला केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे अस्वल जंगलात पळून गेले. अस्वलाबरोबर झालेल्या झटापटीत गावडे गंभीर जखमी झाले आहेत.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या यशवंत यांना तातडीने चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहीती घेतली.
दरम्यान, शेतकऱ्यावर असवलाचा हल्ला झाल्याचे कळताच चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी जिल्हा उपवनरक्षक धुमाळ व चंदगड रेंजर दत्तात्रय पाटील यांना तातडीची मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.



























































