
सामना प्रतिनिधी । लातूर
बजाज अलियांझ कंपनीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेबरोबर करार केला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विमा काढण्याचा सपाटा बँकेच्या वतीने सुरू करण्यात आला. बँकेच्या व्यवस्थापकाने ३ लाखाचा विमा दिला तर त्याला परदेशवारी होती त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या बोगस सह्या करून विमा काढण्यात आल्याचा प्रकार बजाज अलियांझ कंपनीच्याच कर्मचाऱ्याने एका व्हिडीओद्वारे सोशल मिडीयावर उघडकीस आणला आहे. या प्रकाराने लातूरात खळबळ उडाली आहे.
बजाज अलियांझ कंपनीच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत करार करण्यात आला होता. बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने तीन लाखाचा विमा मिळवून दिला तर त्याला परदेशवारीची संधी होती. त्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून विमा उतरवण्यात आला आहे. कर्ज काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा जबरदस्तीने विमा काढण्यात आलेला असल्याचेही व्हिडीओमध्ये कर्मचाऱ्याने नमूद केले आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात या व्हिडीओमुळे धुमाकूळ घातला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक व्ही. वसाळे यांनी दै. सामनास सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्यास बजाज अलियांझ कंपनीने काढून टाकलेले आहे. त्यामुळे त्याने व्हिडीओ बदनामी करण्यासाठी तयार केला आहे. बँकेचा कंपनीशी करार झाला असल्याचे त्यांनी सांगितले मात्र जबरदस्तीने अथवा बनावट स्वाक्षऱ्या करू विमा काढण्यात आला नसल्याचे सांगितले.





























































