शेतकऱ्यांनी दुभती जनावरे विकायला काढली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

निसर्गाने दगा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज मिळेल अशी घोषणा केल्यानंतरही बँक कर्ज देत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडली आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे पाळलेल्या जनावरांनाच शेतकऱ्यांनी आता विकायला काढले आहे. वर्धा जिह्यातील समुद्रपूर येथील शेतकरी आपली जनावरे घेऊन जनावरांच्या बाजारात विक्रीला घेऊन जाऊ लागले आहेत.

खरिपाचा मोसम सुरू झाला तरीही विदर्भात अनेक भागात २५ टक्केही कर्जवाटप झाले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. तर दुसरीकडे निसर्गाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. जून महिना संपत आला असून पेरणीची वेळ निघून जात आहे. तर कर्जमाफीचा घोळ कायम असल्याने शेतकऱयांना बँकेतून कर्ज मिळणेही कठीण झाले आहे. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून आपली जनावरे विकायला काढली आहेत. पोटच्या पोराप्रमाणेच पाळलेल्या जनावरांना विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूधारा वाहात आहे. तरीपण कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जाग येत नाही ही शोकांतिका आहे. समुद्रपूर येथील शेतकरी सतीश भलमे या शेतकऱयाने पेरणीची सोय करण्यासाठी घरची दुभती गाय विकायला बाजारात आणली आहे. बँकेतून पीक कर्ज मिळाले नाही म्हणून समुद्रपूरच्या बाजारात शेकडो शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकायला आणली आहे. काही शेतकऱ्यांच्या पत्नींनी मंगळसूत्रही सावकाराकडे गहाण पडले आहे. आता शेवटचा मार्ग म्हणून शेतकऱयांनी पोटच्या लेकराप्रमाणे पाळलेली जनावरे विकायला आणली आहेत.

ज्या गाईने दुष्काळात सतीशच्या लेकरांना जगवले, कुटुंबाला रोज दीडशे ते २०० रुपयाचे दूध दिले. कुटुंबाचा आधार असलेली ही गाय परिस्थितीमुळे सतीश भलमेने विकायला काढली आहे.